मोठी बातमी; शरद पवारांनी दिल्लीत बोलावली NCP नेत्यांची बैठक

sharad pawar
sharad pawar

नवी दिल्ली- माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या एका पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. थेट राज्याच्या गृहमंत्र्यांवर खंडणीचे आरोप झाल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याने थेट गृहमंत्र्यांवर असा आरोप केल्यामुळं राज्य सरकारच्या अडचणी वाढल्यात. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. शिवाय या सर्व प्रकारामुळे महाविकास आघाडीची प्रतिमा खराब होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह इतर काही नेते उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. 'साम'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून यात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्यात 100 कोटी मिळवण्याचे लक्ष्य दिले होते, असं पत्रात परमबीर सिंह म्हणाले आहेत. त्यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी या पत्रात चॅटही जोडला आहे. या चॅटचा आधार घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांनी तत्काळ राजीनामा देण्याची मागणी केली आहे. थेट गृहमंत्र्यावरच आरोप झाल्याने ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. त्याचमुळे यावर तत्काळ ठोस काही निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारवर दबाव वाढला आहे.

गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे. गृहमंत्रीपद दुसऱ्या कोणाकडे द्यावे यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादीवर दबाव वाढवला असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचमुळे शरद पवारांनी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. अजित पवार, जयंत पाटील यांनाही दिल्लीला बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. शिवाय या बैठकीत अनिल देशमुखांकडून राजीनामा घेण्याचा निर्णयही होऊ शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com