अफवांवर विश्वार ठेऊ नका; पुणे-बंगळूरु महामार्गाची 'ही' आहे खरी परिस्थिती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 August 2019

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, महामार्गावरील पाणी पूर्णतः ओसरल्याशिवाय वाहतूक सुरू करणार नसल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट सांगीतले आहे.

शिरोली पुलाची : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, महामार्गावरील पाणी पूर्णतः ओसरल्याशिवाय वाहतूक सुरू करणार नसल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट सांगीतले आहे.

सांगली फाटा येथे महापूराचे पाणी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आल्यामुळे, तीन दिवसापासून वाहतूक ठप्प आहे. आज महामार्गावरील पाण्याची पातळी साधारणतः एक फूटाने कमी झाली; मात्र त्यानंतर पाणी पातळी स्थिर आहे.

दरम्यान महामार्गावरून जीवनावश्यक वस्तूची (दूध, भाजीपाला, पेट्रोल -डिझेल) वाहनाची व अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. त्याबाबत सत्यता तपासण्यासाठी फोन खणखणू लागलेत; मात्र प्रत्यक्षात महामार्गावरून कोणतेही वाहतूक सुरू झालेली नाही.

सांगली फाटा ते तावडे हॉटेल पर्यंतचा महामार्गावर सुमारे चार ते पाच फूट पाणी आहे. पाण्याचा वेग प्रचंड आहे. पाण्याच्या वेगाने रस्ता खचला जाण्याची शक्यता वर्त्तवली जात आहे. त्यामुळे महामार्गावरील पाणी पूर्णतः ओसरल्या नंतर, रस्त्याची पाहणी करूनच वाहतूक सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पाण्याची पातळी उतरत असली, तर महामार्गावरील वाहतूक लवकर सुरू होणे अशक्य आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: real situation of Pune Bangalore Highway