Republic Day : राजपथावर दिसणार महाराष्ट्राची ‘त्रिशक्ती‘

माणसाला संकटातून पार पडण्याची ‘महाशक्ती‘ असलेल्या महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन पीठांचे दर्शन २०२३ च्या प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
New Delhi historic Rajpath
New Delhi historic Rajpathsakal
Summary

माणसाला संकटातून पार पडण्याची ‘महाशक्ती‘ असलेल्या महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन पीठांचे दर्शन २०२३ च्या प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

नवी दिल्ली - सर्व मंगलमांगल्ये। शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी। नारायणी नमोस्तुते ।।

माणसाला संकटातून पार पडण्याची ‘महाशक्ती‘ असलेल्या महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन पीठांचे दर्शन २०२३ च्या प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाबाबत संरक्षण मंत्रालयाने संबंधितांना काही सूचना केल्या असून अंतिम सादरीकरण झाल्यावर आगामी प्रजासत्ताकदिनी जे चित्ररथ संचलनात सहभागी होतील त्याची अंतिम यादी आगामी दोन ते तीन दिवसांत जाहीर करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.

राज्याने यंदा एकूण ८ विषयांवरील चित्ररथांचा प्रस्ताव दिला होता त्यातील ‘त्रिशक्ती‘ विषय केंद्राच्या पसंतीस उतरला असून राज्याचा चित्ररथ कर्तव्यपथावर झळकणार हे जवळपास निश्चित मानले जाते.

सरकारने राजपथाचे नामकरण कर्तव्यपथ असे केल्यावर होणाऱया २०२३ च्या पहिल्याच प्रजासत्ताकदिन संचलनात राज्याचाही चित्ररथ असणार याची शक्यता बळावलीआहे. महाराष्ट्राने आगामी प्रजासत्ताकदिनाच्या संचलनासाठी राज्यातील तीन शक्तीपीठांचा महिमा वर्णन करणाऱया देखाव्याची निवड केली आहे. कोल्हापूर, तुळजापूर, माहूर व वणीची सप्तशृंगी देवी या पीठांचे महात्म्य या चित्ररथाच्या माध्यमातून गीतसंगीताच्या माध्यमातून राजपथावर उलगडेल.त्याबरोबरच स्त्रीशक्तीचाही जागर होईल. सुरवातीला यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाचा संचलनात समावेश नव्हता. सूत्रांच्या माहितीनुसार ‘कर्तव्यपथा‘वरील पहिल्याच राज्यातील भाजप उच्चपदस्थांनी दिल्लीतील ‘महाशक्ती‘बरोबर तातडीने संपर्क साधला. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथसिह यांच्या पातळीवर हालचाली होऊन संरक्षण मंत्रालयाच्या याबाबत काल (सोमवारी) झालेल्या बैठकीला महाराष्ट्राला निमंत्रण देण्यात आले. या बैठकीत राज्याच्या चित्ररथाचे सादरीकरण झाल्यावर त्याबाबत काही दुरूस्त्या करण्याच्या सूचना करण्यात आल्या. विशेषतः या देखाव्याबरोबर देवीचा जागरण-गोंधळ सादर करणाऱया काही लोककलाकारांचा समावेश करावा अशी सूचना करण्यात आली. या दुरूस्त्यांनंतर राज्याच्या चित्ररथच्या समावेशाबाबतची अनिश्चितता समाप्त होईल असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राचे चित्ररथ सातत्याने चर्चेत !

१९६० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिली ११ वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात सहभागी झाला नव्हता.

१९८० मध्ये शिवराज्याभिषेक या विषयावरील चित्ररथास प्रथमच अव्वल पारितोषिक मिळाले. त्यानंतर १९८३- बैलपोळा विषयावरील राज्याचा चित्ररथ सर्वोत्तम ठरला.

त्यानंतर १९९३ मध्ये गणेशोत्सव,१९९४ मध्ये ‘शताब्दी‘ व त्यापुढच्या १९९५ मध्ये हापूस आंबे व बापू स्मृती या विषयांवरील राज्याच्या चित्ररथांनी प्रथम क्रमांक मिळविण्याची हॅटट्रिक केली. इ.स. १९८६, १९८८ व २००९ मध्ये महाराष्ट्र राज्याचा अग्रक्रमांक थोडक्‍यात हुकला होता.

त्यानंतर अलीकडे २०१४ मध्ये नारळी पौर्णिमा, २०१५-’पंढरीची वारी’ व २०१८ मध्ये 'शिवराज्याभिषेक' या विषयांवरील महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला होता.

त्यानंतर २०१९ मध्ये राज्याने महात्मा गांधी यांच्या "चले जाव" चळवळीवर आधारित चित्ररथ सादर केला. २०२१ मध्ये ‘वारकरी संत परंपरा‘ या विषयावर आधारित चित्ररथ सादर करण्यात आला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आठ फूट उंचीची आसनस्थ मूर्ती हे या चित्ररथाचे आकर्षण होते. मागच्या वर्षी (२०२२) ‘जैवविविधता‘ या विषयावरील राज्याचा चित्ररथ जनतेची पसंती मिळविणाऱा अव्वल चित्ररथ ठरला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com