Toxic Link | प्लॅस्टिकचे सूक्ष्मकण जमिनीत, महाराष्ट्रातील शेतजमिनी प्रदुषित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

soil pollution

Toxic Link | प्लॅस्टिकचे सूक्ष्मकण जमिनीत, महाराष्ट्रातील शेतजमिनी प्रदुषित

नवी दिल्ली : शेतीमधील प्लॅस्टिकचा वाढता वापर ही डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जमिनीचे तापमान समतोल ठेवण्यासाठी तसेच तिच्यातील आर्द्रता टिकून राहावी म्हणून शेतकऱ्यांकडून प्लॅस्टिकच्या आच्छादनाचा वापर केला जातो पण याच प्लॅस्टिकचे सूक्ष्मकण हे जमिनीत मिसळल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचे दिसून आले आहे.

पाच मिलिमीटरपेक्षाही कमी व्यास असणाऱ्या प्लॅस्टिकच्या सुक्ष्मकणांमुळे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचे दिसून आले आहे. ‘टॉक्सिक लिंक’नावाच्या स्वयंसेवी संस्थेने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही भागांतील जमिनीची पाहणी केली असता त्यातून ही धक्कादायक बाब उघड झाली.

शेतीवर विपरीत परिणाम

या गोळा केलेल्या नमुन्यांची संशोधकांनी मणिपाल ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन येथे तपासणी केली असता त्यातील बहुतांश नमुन्यांमध्ये प्लॅस्टिकचा अंश आढळून आला आहे.

महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी ही आच्छादने वापरानंतर फेकून दिली जातात त्या ठिकाणांवरील मातीमध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण हे एका किलो मृदेमागे ८७.५७ कण एवढे असल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण जवळपास दुप्पट असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. बऱ्याचदा शेतकरी या आच्छादनाचा उपयोग संपल्यानंतर ते शेताच्या शेजारीच एखाद्या खड्ड्यामध्ये टाकून देतात त्यामुळे प्रदूषण होत असल्याचे आढळून आले आहे.

ज्या ठिकाणच्या शेतीमध्ये प्लॅस्टिकच्या आच्छादनाचा वापर केला जात नाही तेथील मातीमध्ये प्लॅस्टिकच्या कणांचे प्रमाणही कमी असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्रातील अर्नुल येथे पंधरा सेंमी खोलीवर प्लॅस्टिकच्या कणांचे प्रति एक किलो मातीमधील प्रमाण हे २०.५४ एवढे आहे.

महाराष्ट्र, कर्नाटकची तुलना

महाराष्ट्रातील भडगावमध्ये पंधरा सेंमीच्या खोलीवर प्रति एक किलो मातीमध्ये सूक्ष्म प्लॅस्टिकचे ४०.४६ एवढे कण आढळून आले असून कर्नाटकातील खानापूर भागामध्ये ३० सेंमी खोलीवर या कणांचे प्रमाण ८.४५ एवढे असल्याचे आढळून आले आहे. हे सर्वांत नीचांकी प्रमाण मानले जाते. या दोन्ही ठिकाणांवर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर केला जातो.

प्लॅस्टिकचे कण हे जमिनीमध्ये मिसळल्याने त्याचा मानवी आरोग्य आणि कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. बऱ्याचदा शेतकरी हे प्लॅस्टिकचे आच्छादन फेकून देतात त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.

- प्रीती बांठिया, मुख्य कार्यक्रम समन्वयक, टॉक्सिक लिंक