डॉक्टर म्हणतात, आम्हाला कोव्हिशिल्डच द्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 17 January 2021

दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कोव्हॅक्सिन नव्हे तर कोव्हिशिल्ड लस दिली जावी, अशी मागणी करणारे पत्र सरकारला लिहिल्याने गोंधळ वाढला आहे.

नवी दिल्ली - देशभरात कोरोनावरील लसीकरणाला सुरवात झाली असताना वैद्यकीय वर्तुळातूनच भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या सुरक्षिततेवरून प्रश्न उपस्थित झाल्याने वाद वाढला आहे. दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कोव्हॅक्सिन नव्हे तर कोव्हिशिल्ड लस दिली जावी, अशी मागणी करणारे पत्र सरकारला लिहिल्याने गोंधळ वाढला आहे. एवढेच नव्हे तर याच मुद्द्यावरून राजकारणही पेटले आहे. भारत बायोटेकने मात्र या लशीचे दुष्परिणाम आढळल्यास नुकसान भरपाई देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. 

सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लशींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाल्यानंतर देशभरात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. कोव्हॅक्सिनच्या चाचणीचे सर्व टप्पे पूर्ण होण्याआधीच ही लस मंजूर करण्यात आली. दोन्हीही लसी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा केंद्र सरकारतर्फे देण्यात आला होता. आज कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांना लस दिली जात असताना दिल्लीच्या राममनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (आरडीए) रुग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र लिहून कोव्हॅक्सिनवर संशय व्यक्त केला आहे. रुग्णालयात कोव्हिशिल्ड ऐवजी कोव्हॅक्सिनला प्राधान्य दिले जात आहे. मात्र या लसीच्या चाचण्याच पूर्ण झाल्या नसल्याचा संशय निवासी डॉक्टरांनी संशय व्यक्त केला आहे. म्हणूनच त्यांनी लस घेण्यासाठी नाव नोंदविणे टाळले. त्याचा या मोहिमेवर परिणाम होऊ शकतो. कोव्हॅक्सिन ऐवजी कोव्हिशिल्ड लस दिली जावी. अशीही मागणी या डॉक्टरांनी केली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भाजप आणि काँग्रेस लसीवरून आमनेसामने 
लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या पत्रानंतर काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनीही कोव्हॅक्सिनच्या सुरक्षेवर सवाल उपस्थित केल्यानंतर आरोग्यमंत्री हर्षवर्धन याणि तिवारी यांच्यात ट्विट वॉर पेटले आहे. तिवारी यांनी लसीच्या आपत्कालीन वापराला मिळालेल्या मंजुरीच्या पार्श्वभूमीवर धोरणाचा अभाव असल्याचा ठपका ठेवताना कोव्हॅक्सिनचा संदर्भ दिला. प्रत्युत्तरादाखल आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मनीष तिवारी आणि काँग्रेस पक्ष केवळ अविश्वास, अफवा पसरविण्यासाठी उतावीळ असल्याचा टोला लगावताना दोन्हीही लशी सुरक्षित असून डॉक्टर मंडळी हिरिरीने लसीकरणात सहभागी झाल्याकडे लक्ष वेधले. त्यावर मनीष तिवारी यांनी पुन्हा लोहिया रुग्णालयातील डॉक्टरांच्या पत्राचा संदर्भ देत आरोग्यमंत्र्यांकडे खुलाशाची मागणी केली. डॉ. हर्षवर्धन यांनी तिवारी यांना ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले नसले तरी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की काही उपद्रवी घटकांचा लशींबाबत अफवा पसरवून गोंधळ उडविण्याचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही. के.पॉल यांनीही कोव्हॅक्सिन पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resident doctors at Rammanohar Lohia Hospital in Delhi demanded covishield vaccine