Narendra Modi : ‘बालकबुद्धी’ला तारतम्य नसते ,मोदी;अनुल्लेखाने राहुल गांधींना फटकारले

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला.
Narendra Modi
Narendra Modisakal

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला. मोदींनी थेट नाव घेण्याचे टाळताना दुसऱ्यांच्या खोड्या काढणाऱ्या, मात्र घरी येऊन कांगावा करणाऱ्या बालकाचे उदाहरण देत राहुल गांधींना लक्ष्य केले. काल सहानुभूती मिळविण्याचा बालकबुद्धीचा कांगावा सुरू होता, असा टोला मोदींनी लगावला.

राहुल गांधींच्या भाषणाचा सूचक हवाला देत मोदींनी, संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक ठरविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रहार काँग्रेसवर केला. ‘हे अपमानजनक वक्तव्य म्हणजे योगायोग आहे की प्रयोग आहे’, असे सूचक विधानही मोदींनी केले. काँग्रेसच्या तोंडाला असत्याचे रक्त लागले आहे, असा दावा करताना ईव्हीएम, संविधान, आरक्षण, राफेल यासारख्या मुद्द्यांवरून काँग्रेसने खोटे आरोप केल्याचे मोदी म्हणाले. अग्नीवीर योजनेवर विरोधकांची टीका म्हणजे देशातील तरुणांनी सैन्यदलांत जाऊ नये, यासाठी त्यांना रोखण्याचे षड्‌यंत्र असल्याचा आरोप मोदींनी केला. काँग्रेस पक्ष कोणासाठी सैन्यदलांना दुबळे करू पाहत आहे, असा संतप्त सवालही पंतप्रधानांनी केला. ‘नीट’ परीक्षेचा उल्लेख करताना मोदींनी, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला.

मोदी म्हणाले,‘‘हजारो कोटींच्या हेराफेरीमध्ये हे (राहुल गांधी) जामीनावर बाहेर असून ओबीसींना चोर म्हटल्यामुळे त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यांच्याविरुद्ध स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा खटला सुरू आहे. बालकबुद्धीला बोलण्याचे आणि व्यवहाराचे तारतम्य नसते. त्यातूनच सभागृहात कोणाची गळाभेट घेण्याचे तर मर्यादा सोडून डोळे मारण्याचे प्रकार घडले आहेत.’’ ‘तुमसे ना हो पायेगा’ असे देश म्हणत असल्याचेही ते राहुल गांधींना उद्देशून म्हणाले.

नापास होण्याचा विश्र्वविक्रम’

‘एनडीए’चे तिसऱ्यांदा सरकार येणे ही ऐतिहासिक घटना असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला. काँग्रेस पक्षाला सलग तिसऱ्यांदा १०० चा आकडा गाठता आलेला नाही. हा राजकीय इतिहासातील सर्वांत मोठा पराभव आहे. १९८४ नंतर काँग्रेसला मागील दहा निवडणुकांमध्ये २५० जागा मिळवता आलेल्या नाही. काँग्रेसला मिळालेले ९९ टक्के १०० पैकी नसून ५४५ पैकी आहेत. परंतु नापास होण्याचा विश्वविक्रम बनविणाऱ्या बालकबुद्धीला हे कोण समजावणार?’’

‘काँग्रेस परजीवी’

पंतप्रधान मोदींनी ‘शोले’ चित्रपटातील ‘मौसी’ या पात्राचे उदाहरण देत काँग्रेसला कोपरखळी लगावली. ‘१३ राज्यांमध्ये शून्य जागा येऊनही हे हिरो बनत आहेत’, असा चिमटा त्यांनी काढला आणि उत्सव साजरा करण्याऐवजी इमानदारीने जनादेश स्वीकारा, असा सल्लाही काँग्रेसला दिला. काँग्रेसला ‘परजीवी’ अशी उपरोधिक उपाधी देताना काँग्रेस पक्ष मित्रपक्षांची मते खात असल्याचे मोदी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com