esakal | सिद्धूने पहिली इनिंग तर जिंकली... आता कॅप्टन काय करणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Amarinder Singh and Sidhu

सिद्धूने पहिली इनिंग तर जिंकली... आता कॅप्टन काय करणार?

sakal_logo
By
योगेश कानगुडे

महिनाभराच्या अथक प्रयत्नानंतर रविवारी रात्री नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. कित्येक महिन्यांपूर्वी गांधी कुटुंब आणि त्यांचे सर्वात शक्तिशाली मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना असे आव्हान देईल याची कुणीही कल्पनाही केली नसेल. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी वारंवार विरोध करूनही नवज्योतसिंग सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष केले गेले, त्यांच्यासह चार कार्यकारी अध्यक्षांचीही नेमणूक केली गेली, त्यातील एकाही नेता कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या गटातील नाही. याचाच अर्थ असा की कॉंग्रेस नेतृत्वाने अमरिंदर यांना एक प्रकारे वेगळा संदेश दिला आहे. तसेच राज्यात त्यांचा एक हाती असलेले वर्चस्व कमी करून परत ते गांधी घरण्याकडे एकवटण्याचा प्रयत्न केला जात आहे.

प्रचंड विरोधानंतर सिद्धूंची पंजाब काँग्रेस अध्यक्षपदी नेमणूक होणं म्हणजे अमरिंदर हे ज्याप्रमाणे राज्यात पक्ष चालवतात त्याला दिलेलं सार्वजनिक उत्तर आहे असं अनेक नेते खासगीत बोलून दाखवत आहे. खरं तर हा वाद वाढण्यास काही घटना कारणीभूत आहेत. ज्यावेळी सिद्धू यांचा कॉंग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश झाला त्यावेळी अमरिंदर सिंग यांच्याशी पक्ष नेतृत्वाने चर्चा केली नाही अशी चर्चा सतत होत असते. दुसरं मुख्य कारण म्हणजे सिद्धूमुळे पक्षात त्यांच्या नेतृत्वाला भविष्यात आव्हान निर्माण होईल असं वाटत होतं. तेव्हापासून या दोघांमध्ये दरी निर्माण होण्यास सुरुवात झाली.

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर आणि नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सिद्धू यांच्यातील कटुता एवढी टोकाला गेली आहे की त्यावर पर्याय म्हणून दिल्लीतील नेत्यांनी एक 18 मुद्द्यांची 'टू डू लिस्ट' मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना दिली आहे आणि निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासने पूर्ण करण्यास सांगितले. राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी 8 महिन्यांवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडमोडींनी वेग घेतला आहे.

एक काळ असा होता की सिद्धू पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना सांगितले, माझी सरकारी कार चांगली नाही. त्याच वेळी, कॅप्टन सिंग यांनी त्यांची लँड क्रूझर कार, ज्यात स्वत: मुख्यमंत्री वापरत होते, नवज्योतसिंग यांना दिली. आज सिद्धूने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडून पंजाबची कमांड हातात घेतली आहे.

सिद्धू हे पक्षात आल्यापासून नेहमी सांगत आहेत की, मी कॉंग्रेसमध्ये प्रियंका गांधी यांच्यामुळे आलो आहे. सिद्धू यांच्या नियुक्तीचा पंजाबमध्ये त्याचे परिणाम दूरगामी होणार आहेत. खरं तर 2014 आणि 2019 च्या पराभवानंतर गांधी कुटुंबावर कठोर निर्णय घेण्यात सक्षम नसल्याचा आरोप करण्यात आला. दुसर्‍या पिढीतील नेत्यांना पक्षात स्थान मिळत नाही. प्रियंका गांधींनी सिद्धू यांना पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष केले आहे आणि त्यांनी असे सूचित केले आहे की,कॉंग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंब कमजोर नसून त्यांच्यावर कोणी दबाव आणू शकत नाही. सिद्धू यांच्या माध्यमातून गांधी परिवाराला पुन्हा एकदा गमावलेले वर्चस्व कॉंग्रेस पक्षावर प्रस्थापित करायचे आहे, जे केवळ पंजाबपुरते मर्यादित राहणार नाही. राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, गुजरात आणि इतर राज्यातही असेच मोठे निर्णय घेतले जातील. ज्या राज्यात पक्ष दोन गटात विभागलेला आहे अशा प्रत्येक राज्यात याचा परिणाम होईल. अनेक आश्चर्यकारक निर्णय होतील.

या घडामोडी दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून हे स्पष्ट केले होते की पंजाबचे नेते आणि कार्यकर्ते नवज्योतसिंग यांचे नेतृत्व स्वीकारत नाहीत. पंजाबमधील खासदारांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की अध्यक्षपदी सिद्धू नियुक्त झाले तर कोणतेही खासदार आपल्या मतदार संघात त्यांचे स्वागत करणार नाहीत. प्रत्येकाने या निर्णयावर सहमती दर्शविली. त्याशिवाय दहा आमदारांनी अशी पत्रे लिहिली आहेत की, कॅप्टन अमरिंदरसिंग यांना पर्याय नाही. ते पंजाब कॉंग्रेसचा एकमेव आवाज आहेत. एवढे सर्व करूनही गांधी परिवाराने कोणाचीही पर्वा न करता नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाब कॉंग्रेसचा "कॅप्टन" म्हणून नियुक्त केले.

पंजाबमध्ये आठ महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत त्या दृष्टीने सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अकाली दलाने एक पाऊल पुढे टाकत हिंदू उपमुख्यमंत्र्यांचे कार्डही वापरले आहे. पंजाबमध्ये जवळपास 39टक्के दलित समाजातील लोकांचे मतदान आहे. ही बाब हेरून अकाली दलापासून वेगळे झालेल्या भाजपने मुख्यमंत्री पद हे दलित समाजातील व्यक्तीला दिले जाईल अशी घोषणा केली आहे. अकाली दलाने खेळलेल्या हिंदू-दलित उपमुख्यमंत्री फाॅर्म्युल्याचा परिणाम हाेणार याची कल्पना मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आहे. त्यामुळे त्यांनी सामाजिक समताेलासाठी प्रदेशाध्यक्ष हिंदू असावा असा त्यांचा विचार होता. परंतु सिद्धू यांची निवड झाल्याने हा मुद्दा आता निकाली निघाला आहे.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर तिकिट वाटपादरम्यानही मोठा वाद निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे प्रदेशाध्यक्ष सिद्धू यांना मोळीक देतील असं चित्र कुठेही दिसत नाही. जर दिल्लीतील नेत्यांनी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर ते वेगळी भूमिका घेऊ शकतात. नवीन पक्ष काढून ते कॉंग्रेसला मोठे भगदाड पाडू शकतात. त्यांचा स्वतंत्र असा जनाधार आणि प्रभावक्षेत्र आहे. आपल्याला मुख्यमंत्री बनवलं जात नाही, हे लक्षात आल्यास ते पक्षाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सध्या पंजाब कॉंग्रेसमध्ये मोठा कलह आहे. विधानसभा निवडणुकांच्या आधी पक्षांतर्गत या दोघांचा संघर्ष थांबला नाही तर राज्यात काँग्रेसची वाईट अवस्था होऊ शकते.

loading image