
मोदी करायचे फॉलो, मागितली मदत; अखेर RSS कार्यकर्त्याचा बेडविना मृत्यू
आग्रा : देशात सध्या कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणावर थैमान घालत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून देशात सध्या चिंतेचं वातावरण बनलं आहे. नरेंद्र मोदी सरकार कोरोनाचं हे संकट हाताळण्यात कमी पडत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. याचंच एक उदाहरण आता आग्रामधून समोर येत आहे. आग्र्यामध्ये एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा काही साधासुधा स्वयंसेवक नव्हता तर ज्याला ट्विटरवर खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करत होते, असा हा स्वयंसेवक होता. इतकेच नव्हे, तर मोदींचा कट्टर चाहता असलेल्या या स्वयंसेवकाने आपल्या कारच्या मागे मोदींचा मोठा फोटो देखील लावला होता. कोरोनाग्रस्त झालेल्या या स्वयंसेवकाचं नाव अमित जयस्वाल असं होतं. कोरोनाने त्याचा मृत्यू होण्यापूर्वी त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदतीचं आवाहन केलं होतं. मात्र, त्याचं ते आवाहन निष्फळच ठरलं. खुद्द नरेंद्र मोदी फॉलो करत असणाऱ्या अमितला मोदींकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकली नाही. आणि सरतेशेवटी त्याला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना घडली आहे.
कोरोना संक्रमित झाल्यानंतर त्याच्यासाठी बेड मिळवण्यासाठी कुंटुबिय झटत होते. त्यासाठी त्यांनी थेट ट्विटरवर ट्विट करत मोदींना टॅग करत आवाहनही केलं. सोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी आवाहन केलं होतं. मात्र, त्याला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. 42 वर्षीय अमितचा त्यानंतर दहाच दिवसाच मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांतच त्याच्या आईचा प्राणदेखील कोरोनाने घेतला.
जयस्वाल यांचं कुटुंब स्वत:ला नेहमी मोदी भक्त म्हणवून घेत आलं आहे. जयस्वाल यांनी ट्विटरवर आपल्याला खुद्द नरेंद्र मोदी फॉलो करत असल्याचं अभिमानाने लिहलं होतं. त्यामुळे कोरोनाच्या या संकटामध्ये मोदी नक्कीच आपल्याला मदत करतील असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांना होता. तो मोदी आणि योगींच्या विरोधातील एक शब्द देखील सहन करु शकत नव्हता. जर कुणी त्यांच्याबद्दल चकारही टीकेचा शब्द उच्चारला तर तो त्यांना मारण्याचा धमकी देत असे, असं सोनू अलघ या जयस्वाल यांच्या मोठ्या बहिणीनं सांगितलं.
हेही वाचा: इस्रायल-पॅलेस्टाईनचा संघर्ष नेमका काय आहे?
29 एप्रिल रोजी मथुरेतील नियती हॉस्पिटलमध्ये अमित यांचा मृत्यू झाला. आणि त्यादिवशी सोनू आणि तिच्या पतीने अमितच्या कारच्या मागे असणारा मोदींचा फोटो फाडून टाकला. या संतप्त दांपत्याने यावेळी म्हटलंय की, ते याबाबत नरेंद्र मोदींना कधीच माफ करणार नाहीयेत. अमितने संपूर्ण आयुष्य पंतप्रधान मोदींसाठी वाहून दिलं होतं. मात्र, मोदीने त्याच्यासाठी काय केलं? अशा पंतप्रधानाची आम्हाला गरजच काय? आम्ही हे पोस्टर फाडून फेकून दिलं आहे, असं अमितची बहिण सोनू यांच्या पतीने म्हटलं आहे.
Web Title: Rss Worker Amit Jaiswal Dies Of Covid Pm Modi Followed On Twitter Did Not Help Despite Plea Tweet By
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..