Sahitya: चतुरस्त्र लिखाण करणाऱ्या आणि लहान मुलांच्या लाडक्या शांता शेळके आजींची आज जन्म शताब्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shanta Shelke

Sahitya: चतुरस्त्र लिखाण करणाऱ्या आणि लहान मुलांच्या लाडक्या शांता शेळके आजींची आज जन्म शताब्दी

भाषा अनुवादन, समीक्षा लेखन, वृत्तपत्र सहसंपादन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेखन या साऱ्याच साहित्यात शांता शेळके यांनी आपला खूप अनमोल ठेवा दिला आहे. शांता शेळकेंचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ पुण्यातल्या इंदापूर गावात झाला होता आणि शिक्षण पुण्यात हुजूरपागा शाळेत आणि स.प. महाविद्यालय झाले. आचार्य अत्र्यांच्या "नवयुग’ मध्ये त्या ५ वर्षे उपसंपादक होत्या मग त्यांनी नागपुरातील हिस्लॉप कॉलेज आणि मग मुंबईमधल्या रुईया व महर्षी दयानंद कॉलेजमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. 

हेही वाचा: Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक तांदळाच्या पिठाच्या ढेबऱ्या कशा तयार करायच्या?

त्या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या आणि राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या. बालसाहित्य, समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत लेखिका म्हणून तर कवयित्री आणि गीतकार म्हणून आजच्या पिढीतही त्यांची ओळख आहे. ’तोच चंद्रमा’, ’कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ’चित्रगीते’ ही काही त्यांची म्युसिक अल्बम प्रसिद्ध आहेत. शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्याचे अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेले आहे. त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी, इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंब-या प्रसिद्ध आहेत.

हेही वाचा: Diwali Recipe: दिवाळी स्पेशल घरच्या घरी कंदी पेढा कसा तयार करायचा?

धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा खूप सुंदर आहे. स्वतःच्या लहानपणाबद्दलच्या त्यांच्या आठवणींचा आपल्याला खरोखर हेवा वाटतो. त्यांचे ’पावसाआधीचा पाऊस’, ’आनंदाचे झाड’, ’वडीलधारी माणसे’ हे त्यांचे ललित लेख खूपच गाजलेले आहेत.

शांताबाईंनी वेगवेगळे साहित्य प्रकार लिहिले असले तरी त्यांची कविता लेखनाकडे वेगळीच गोडी आहे. ’असेन मी नसेन मी’ , ’वर्ष’, ’रूपसी’, ’गोंदण’, ’अनोळख’, ’जन्माजान्हवी’ ही त्यांच्या कविता संग्रहांची काही नावे. ’मुक्ता आणि इतर गोष्टी’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता. ’स्वप्नतरंग’ ही त्यांची पहिली कादंबरी; तर ’शब्दांच्या दुनियेत’ हा त्यांचा पहिला ललितलेखसंग्रह होता. 

हेही वाचा: Bhulabai: भुलाबाईच्या पारंपरिक गाण्यांचा इतिहास

“मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश”,“शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” ही चित्रपट गाणी त्यांच्याच लेखणीतून आली आहे. वास्तविक शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आजी. नातवंडांसाठी “किलबिल किलबिल पक्षी बोलती”, “विहीणबाई विहीणबाई” अश्या अनेक छान छान कविता, बालगीतं लिहिणा-या हक्काच्या आजी.

६ जून २००२ रोजी ७९ व्या वर्षी शांता शेळके यांचे निधन झाले.