esakal | नाशिकच्या मूठभर धान्य उपक्रम चळवळीचा पंतप्रधानांकडून गौरव
sakal

बोलून बातमी शोधा

Residential Photo

नाशिकच्या मूठभर धान्य उपक्रम चळवळीचा पंतप्रधानांकडून गौरव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः कुपोषण निर्मूलनासाठी आवश्‍यक असलेल्या पोषणामध्ये लोकसहभाग मिळावा म्हणून नाशिक जिल्हा परिषदेने गेल्यावर्षी "मूठभर धान्य' उपक्रम राबवला. त्यात मिळालेल्या लोकसहभागाचा आवर्जून उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज "मन की बात'मध्ये उपक्रमाचा गौरव केला. अशाच नवीन उपक्रम जोडत पुढील महिन्यातील "पोषण महा' मध्ये प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन भारतीयांना केले. 

भंडाराचे आताचे जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत असताना कुपोषण निर्मूलनाला विशेष स्थान दिले होते. ते म्हणाले, की गेल्यावर्षी जूनमध्ये मध्यम आणि अतितीव्र अशी 17 हजारांहून अधिक कुपोषित बालके बालविकास केंद्रांमध्ये दाखल झाली होती. अशा बालकांच्या घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविकांनी "असेल त्या धान्य द्या', अशी विनंती केली. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आणि नियमित आहाराच्या जोडीला स्वतंत्र आहार कुपोषित बालकांना मिळाला. कुपोषण निर्मूलनात सहभागी होण्याची जाणीव लोकांमध्ये तयार होत असल्याची अनुभूति त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यात एका आठवड्यात आली. मग त्याचा विस्तार जिल्हाभर केला. "पोषण माह' मध्ये सप्टेंबरमध्ये "मूठभर धान्य' हा उपक्रम राबवला. 
जिल्ह्यातील आठ तालुक्‍यातील आदिवासी लोकसंख्या असून आदिवासी कुटुंबांमध्ये कुपोषणाची समस्या आहे. शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांमध्ये राज्यात कुपोषणाचे प्रमाण दहा, तर नाशिक जिल्ह्यात 8 टक्के इतके प्रमाण आहे. जिल्ह्यातील 5 हजार 282 अंगणवाड्यांमधून शून्य ते सहा वर्षे वयोगटातील चार लाख बालकांना पोषण आहार पुरवण्यात येतो. खरिपाची काढणी केल्यावर आणि आठवडा बाजारातून भाजीपाला, डाळी खरेदी केल्यावर त्यातील मूठभर धान्य अंगणवाडीसाठी देण्यात यावे अशा स्वरुपाचा हा उपक्रम होता. हिरवा भाजीपाला, गूळ, शेंगदाणे, बटाटे, डाळी ग्रामस्थांनी उपक्रमातंर्गत अंगणवाडी सेविकांकडे जमा केले. त्याचा वापर अंगणवाडीतील मुलांना केला गेला. 
 
अक्षयपात्र उपक्रमाचीही जोड 
"मूठभर धान्य'ला अक्षयपात्र उपक्रमाची जोड जिल्हा परिषदेने दिली. अंगणवाडीमध्ये शिंके टांगून त्यात दुरडी ठेवण्यात आली होती. त्यामध्ये टोमॅटो, गाजर, कोथिंबीर असे ठेवावे अशी मूळ भूमिका उपक्रमातंर्गतची होती. याही उपक्रमाला ग्रामस्थांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्यामुळे नियमित आहाराच्या जोडीला हिरव्या भाजीपाल्याचा आहार स्वतंत्रपणे अंगणवाड्यांमधील बालकांना मिळाला. दरम्यान, संस्कृत सुभाषिताचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, की नवजात शिशू आणि महिला या आपल्या समाजाचे भविष्य आहेत. पोषण अभियानातंर्गत पोषण जनआंदोलन उभे राहिले. कुपोषणाच्या विरोधात जनतेने लढाई उभी केली. नाशिकमध्ये कल्पक उपक्रम राबवला. या जनआंदोलनातून जमा झालेले अन्न अंगणवाडी सेविकांनी बालकांना खायला घातले. उपक्रमात सहभागी झालेला प्रत्येक जागृक नागरिक समाजसेवक बनला. गरीब आणि संपन्न कुटुंबातील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी कुपोषणाच्या विरोधात लढाई लढणे आवश्‍यक आहे. त्यातून एकाला कुपोषणातून बाहेर काढणे म्हणजे, देशाला कुपोषणमुक्त करणे असे आहे. 
 
"सकाळ'चा उपक्रम पोचला राज्यात 
"सकाळ'तर्फे कुपोषण निर्मूलनाचा उपक्रम समाजाच्या सहभागातून गाजरवाडी (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे राबवण्यात आला होता. कुपोषणाच्या कारणांचा शोध घेत आयुर्वेदाच्या माध्यमातून पोषण आणि पूरक आयुर्वेदिक औषधांचा इलाज करण्याचा हा "नाशिक पॅटर्न' राज्यभर पोचला होता. राजमाता जिजाऊ मिशनचे तत्कालिन अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी या उपक्रमाच्या धर्तीवर राज्यात कुपोषण निर्मूलनाचा कार्यक्रम राबवला. "सकाळ'च्या या उपक्रमाने कुपोषण निर्मूलनाच्या चळवळीला बळ मिळाले. 

कुपोषण निर्मूलनात ग्रामपंचायतींनी सहकार्य केले. पण लोकसहभाग मिळवण्यासाठी पैश्‍यांची मागणी केली गेली असते, तर त्याचा हिशेब विचारला गेला असता. मात्र खऱ्या अर्थाने लोकसहभाग मिळावा म्हणून "मूठभर धान्य' अन्‌ "अक्षयपात्र' उपक्रमाचा समावेश केला गेला. आपण कुपोषण निर्मूलनात सहभागी झाल्याचा आनंद मिळाला. या दोन्ही उपक्रमांची नोंद युनिसेफने घेतली आहे. केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांना ही माहिती युनिसेफच्या माध्यमातून मिळाली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात' मध्ये "मूठभर धान्य' उपक्रमाचे कौतुक केले. हे यश ग्रामस्थ, उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आहे. 
- डॉ. नरेश गिते (जिल्हाधिकारी, भंडारा) 

loading image
go to top