
राज ठाकरे एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येला निघाले, राऊतांचा टोमणा
राऊतांकडून बृजभूषण सिंहांचे कौतुक म्हणाले, लढवय्या माणूस..
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. राजकीय वर्तुळात अनेक घटना सातत्याने पाठोपाठ घडत असल्याने वातारण तापलं आहे. मनसे, भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप पहायला मिळत आहेत. दरम्यान, सध्या शिवसेना नेते संजय राऊत आणि आमदार रवी राणा हे लेहच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आज दिल्लीत बोलत असताना खासदार राऊत यांनी राज ठाकरेंना आयोध्या दौऱ्यावरून टोले लगावले आहेत.
भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आक्रमक विरोध केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा वादात सापडला आहे. आता या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 'राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी आधी उत्तर भारतीयांना विरोध करत मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र आता त्यांनी भूमिका का बदलली हे मला माहीत नाही. ते एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येला निघाले,' असं वक्तव्य करत राऊत यांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे.
हेही वाचा: मंदिर मस्जिद वादावर आशुतोष राणांचं काव्यमय उत्तर, व्हिडिओ व्हायरल
पुढे संजय राऊत म्हणाले, बृजभूषण शरण सिंह हे त्यांची भूमिका मांडत आहेत. बृजभूषण सिंह यांना मी अनेक वर्ष ओळखतो. तो माणूस लढवय्या आहे. त्यांचे महाराष्ट्राशी संबंध फार जुने आहेत. आम्ही त्यांना नेताजी म्हणतो. ते स्वत: पैलवान आहेत. अनेक कुस्तीगीर त्यांनी निर्माण केले. आम्ही एकत्र काम केले आहे तो माणूस मागे हटणार नाही असं वाटतं अशा शब्दात शिवसेनेने त्यांचे कौतुक केले आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविषयी राऊत म्हणाले की, 'राज ठाकरे यांनी तिकडे एखादं घर घेतलं, मठ किंवा आश्रम बांधला तरी तो त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना आणि अयोध्येचं नातं काही आजचं नाही. हे नातं राजकीय नाही. आम्ही तिकडे सतत जात असतो. राम मंदिर आंदोलनापासून आमचा अयोध्येशी संबंध आहे, असं राऊतांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा: महागाई! मोदी सरकारचा सामान्यांना दणका, घरगुती गॅसच्या दरात वाढ
प्रत्येक धार्मिक आणि ऐतिहासिक जागांचं उत्खनन करून धार्मिक तेढ निर्माण करायचे. दंगली पेटवायच्या हे दोन्ही बाजूने टाळायला हवे. अनेक हिंदुत्ववादी संघटना आहे. प्रत्येक पाऊल संयमाने काळजीपूर्वक घ्यावं. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढायला हवी परंतु भाजपाकडून २०२४ ची तयारी सुरू आहे. महागाईवर कोणी बोलत नाही. बेरोजगारीवर कोणी बोलत नाही. फक्त मशीद, मंदिर यावर निवडणुका लढवल्या जात आहेत. कैलास मानसरोवर चीनच्या ताब्यात आहे ते भारताने मिळवावं असं आव्हान संजय राऊतांनी केलं आहे.
Web Title: Sanjay Raut Appreciate To Brijbhushan Sharan Singh Criticized To Raj Thckeray Ayodhya Tour
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..