PM Narendra Modi : ‘संकल्पपत्रा’तून विकासाची गॅरंटी; भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध; गरीब, युवक, शेतकरी, महिला केंद्रस्थानी

केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास समान नागरी कायदा लागू करण्याचे आणि ‘एक देश, एक निवडणूक’ प्रणाली अमलात आणण्याचे आश्‍वासन भाजपने आज देशवासीयांना दिले.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSakal

नवी दिल्ली : केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास समान नागरी कायदा लागू करण्याचे आणि ‘एक देश, एक निवडणूक’ प्रणाली अमलात आणण्याचे आश्‍वासन भाजपने आज देशवासीयांना दिले. देशातील प्रमुख चार वर्गांना केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या जाहीरनाम्याचे, ज्याला त्यांनी ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे, त्याचे प्रकाशन केले.

विकास आणि परंपरा या दोन्ही बाबींवर विश्‍वास ठेवून भारताला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर नेऊ, असा विश्‍वास मोदींनी या वेळी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला पाच दिवसांचा कालावधी उरला आहे.

इतर महत्त्वाच्या पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले असल्याने भाजपच्या जाहीरनाम्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दीनदयाळ मार्गावरील भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘संकल्पपत्रा’चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जाहीरनामा समितीचे अध्यक्ष व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते.

‘मोदींची गॅरंटी २०२४’

गरीब, युवक, अन्नदाता आणि नारीशक्ती (ग्यान) अशा चार घटकांना केंद्रीभूत ठेवून भाजपने जाहीरनामा तयार केला आहे. ‘मोदींची गॅरंटी २०२४’ असे शीर्षक जाहीरनाम्याला देण्यात आले आहे. सध्या राबविल्या जात असलेल्या विविध योजना पुढील काळातही राबविण्यात येतील, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

आश्‍वासनांची माहिती देताना मोदी म्हणाले की, मोफत खाद्यान्न वाटप योजनेअंतर्गत जनतेला पुढील पाच वर्षे मोफत धान्य दिले जाईल. पायाभूत सुविधा क्षेत्रात देश वेगाने प्रगती करीत आहे असून भविष्यात सामाजिक, डिजिटल आणि भौगोलिक सुविधांचा विकास केला जाईल. देशाच्या कानाकोपऱ्यात ‘वंदे भारत’ रेल्वेचा विस्तार केला जाईल. स्लीपर, चेअर कार आणि मेट्रो अशा तीन स्वरूपाच्या ‘वंदे भारत’ गाड्या चालवल्या जातील.

भाजप सरकारने चार कोटी लोकांना पक्की घरे बनवून दिली आहेत. आगामी काळात आणखी तीन कोटी पक्की घरे गरिबांना देण्याचा संकल्प करण्यात आला आहे, असे मोदी म्हणाले. ‘‘देशात नवनवीन संस्था आणि विद्यापीठे उघडली जात आहेत.

देशभरात महामार्ग, रेल्वे, हवाई वाहतूक आणि जल वाहतूक यांना अत्याधुनिक बनविले जात आहे. डिजिटल जाळ्याचा विस्तार आता ६-जी पर्यंत पोहोचला आहे. देशहितासाठी समाज नागरी नागरी कायदा लागू करणे आवश्यक आहे. तसेच, एक देश, एक निवडणुकांचा संकल्प घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत.’’

सत्तर वर्षांपुढील सर्वांवर मोफत उपचार

‘आयुष्मान भारत’ योजनेचा विस्तार करण्याचे आश्‍वासन भाजपने दिले आहे. त्यानुसार, ७० पेक्षा अधिक वय असलेल्या गरीब, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय अशा सर्व लोकांना या योजनेचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे सत्तरीपुढील ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येईल.

आयुष्मान योजनेचा लाभ तृतीयपंथीयांनाही देण्याचे भाजपने ठरविले आहे. पीएम सूर्य घर विद्युत योजनेच्या माध्यमातून वीजेचे बिल शून्य येण्याच्या योजनेवर काम चालू झाले आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हा आमचा भाव आहे आणि हाच भाजपच्या संकल्पपत्राचा आत्मा आहे, असे मोदींनी यावेळी सांगितले.

सहकार धोरण राबविणार

खाद्यान्न प्रक्रिया क्षेत्रात देशाला जागतिक हब बनविण्याचा आमचा निर्धार आहे, असे सांगत मोदी म्हणाले, ‘‘बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती देशपातळीवर साजरी केली जाणार आहे. डिजिटल आदिवासी कला अकादमीची सरकार स्थापना करेल.

सहकारातून समृद्धीचा वसा घेत राष्ट्रीय सहकार धोरण आणले जाणार आहे. देशभरात डेअरी आणि सहकारी संस्थांची संख्या वाढवली जाईल. ‘श्री अन्न’ वर जास्त भर दिला जाईल. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. आमचे संकल्प पत्र युवकांच्या आशा आकांक्षेचे प्रतिबिंब आहे.’’

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मागील पाच वर्षांच्या भाजप सरकारच्या कामाचा आढावा घेतला. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

१४ लाख सल्ल्यांचा विचार

संकल्पपत्र तयार करण्यासाठी ‘नमो ॲप’च्या माध्यमातून चार लाख सल्ले आले, तर १० लाख सल्ले व्हिडिओच्या माध्यमातून आले. या सर्व सल्ल्यांचा विचार संकल्पपत्र तयार करताना केला गेला, असा दावा भाजपने केला आहे. जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे २४ भागांत वाटण्यात आले आले आहेत.

‘संकल्पपत्रा’तील प्रमुख आश्वासने...

  • समान नागरी कायदा लागू केला जाणार

  • ‘एक देश, एक निवडणूक’ प्रणालीचा अवलंब

  • पूर्व, दक्षिण आणि उत्तर भारतात बुलेट ट्रेन धावणार

  • मोफत धान्य वाटपाची योजना यापुढेही राबविली जाणार

  • गरिबांसाठी तीन कोटी पक्की घरे

  • पाइपच्या माध्यमातून घरोघरी गॅसचा पुरवठा

  • पीएम आवास योजनेत दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य

  • दहा कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत राहणार

  • ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींचा सन्मान वाढविणार

हे जुमलापत्र आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात महागाई आणि बेरोजगारी हे शब्दच नाहीत. लोकांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास भाजप तयार नाही, हेच सिद्ध होते.

- राहुल गांधी, काँग्रेसचे नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com