'ओम' आणि 'गाय'मुळे अनेकांना धक्का : पंतप्रधान

वृत्तसंस्था
Wednesday, 11 September 2019

हल्ली काही मंडळींच्या कानावर 'गाय' आणि 'ओम' शब्द पडला की त्यांना धक्का बसतो, त्यांच्या अंगावरील केस उभे राहतात, त्यांना आपला देश सोळाव्या शतकात गेल्यासारखे वाटते, हे खरोखरच दुर्दैवी आहे.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

मथुरा (उत्तरप्रदेश) : हल्ली काही मंडळींच्या कानावर "गाय' आणि "ओम' शब्द पडला की त्यांना धक्का बसतो, त्यांच्या अंगावरील केस उभे राहतात, त्यांना आपला देश सोळाव्या शतकात गेल्यासारखे वाटते, हे खरोखरच दुर्दैवी आहे, असे ज्ञान सांगणाऱ्यांनीच देशाला बरबाद केले. पशुधनाशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार तरी करता येतो का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केला.

मथुरा येथील राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांसाठीच्या अन्य कल्याणकारी योजनांचाही शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधानांनी येथे राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाची सुरवात केल्यानंतर काही शेतकऱ्यांशीही संवाद साधला.

मोदी म्हणाले, "भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पर्यावरण आणि पशुधन हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. निसर्ग आणि आर्थिक प्रगती यांच्यातील समतोल साधला तरच आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेला बळकट करता येईल.'' प्लॅस्टिकबंदीचा पुनरूच्चार करताना मोदींनी प्लॅस्टिकच्या वापरामुळे पर्यावरण धोक्‍यात येऊ लागले असून मासे देखील मरण पावत असल्याचा दावा केला. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी "स्वच्छता ही सेवा' या अभियानास सुरवात झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saying Om or cow is not regressive says Narendra Modi