'एसबीआय' म्हणते, नवरा बायकोचे डेबिट कार्ड वापरू शकत नाही

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

बँकेच्या या पवित्र्यामुळे वंदना आणि राजेश कुमार यांनी ग्राहक मंचाकडे दाद मागितली. याबाबत ग्राहक मंचाने सांगितले, की वंदना यांनी स्वत:चा चेक किंवा स्वहस्ताक्षरातील पत्र पैसे काढण्यासाठी देणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही.  

नवी दिल्ली : बँकेकडून देण्यात येणाऱ्या डेबिट कार्डच्या माध्यमातून कोणालाही पैसे काढता येतात. मात्र, आता पती किंवा इतर नातेवाईक आणि मित्रांना पैसे काढण्यास सांगणे, चांगलेच महागात पडणार आहे. कारण भारतीय स्टेट बँकेने सांगितले, की डेबिट कार्ड अहस्तांतरित असल्याने खातेदाराशिवाय कोणालाही डेबिट कार्डचा वापर करता येऊ शकत नाही. मग नवरा असो किंवा अन्य कोणीही नातेवाईक. 

मराठाहल्ली येथील रहिवासी असलेल्या वंदना यांनी त्यांचे पती राजेश कुमार यांना त्यांच्या बँक खात्यातून 25 हजार रूपये काढण्यासाठी त्यांचे डेबिट कार्ड पिनसह दिले होते. त्यानुसार राजेश एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी एटीएम कार्डच्या पिनसह रक्कम टाकली. मात्र, एटीएम मशिनमधून पैसे न येता थेट पैसे काढल्याची रिसिटच प्राप्त झाली. त्यामुळे राजेश कुमार यांनी त्वरित याबाबतची माहिती स्टेट बँकेला दिली. 

त्यावर स्टेट बँकेने सांगितले, की एटीएम कार्ड हे अहस्तांतरित असून, ज्यांनी ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला त्यांना पैसे काढण्याचा अधिकार नाही.   

बँकेच्या या पवित्र्यामुळे वंदना आणि राजेश कुमार यांनी ग्राहक मंचाकडे दाद मागितली. याबाबत ग्राहक मंचाने सांगितले, की वंदना यांनी स्वत:चा चेक किंवा स्वहस्ताक्षरातील पत्र पैसे काढण्यासाठी देणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही.  

''मी गर्भवती असल्याने मला स्वत: एटीएम सेंटरमध्ये जाऊन पैसे काढता आले नाही. त्यामुळे मी माझे एटीएम कार्ड माझ्या पतीला दिले आणि 25 हजार रुपये काढण्यास सांगितले. पैसे काढण्यात आल्याचा मेसेज मला प्राप्त झाला. मात्र, पैसे मला मिळालेच नाही. त्यामुळे मला 25 हजारांची रक्कम पुन्हा मिळावी'', अशी मागणी वंदना यांनी ग्राहक मंचाकडे केली.  

Web Title: SBI says husband cant use wifes debit card court agrees