Aarey forest: आणखी झाडे तोडण्यास स्थगिती कायम

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 22 October 2019

 मुंबईतील ‘आरे’ कॉलनी परिसरात मेट्रोच्या कारशेडचे बांधकाम करण्यास आडकाठी नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करतानाच आणखी झाडे तोडण्यासाठीची ‘जैसे थे’ परिस्थिती किंवा स्थगिती कायम असल्याचे आज नमूद केले.

नवी दिल्ली -  मुंबईतील ‘आरे’ कॉलनी परिसरात मेट्रोच्या कारशेडचे बांधकाम करण्यास आडकाठी नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करतानाच आणखी झाडे तोडण्यासाठीची ‘जैसे थे’ परिस्थिती किंवा स्थगिती कायम असल्याचे आज नमूद केले. याप्रकरणी न्या. अरुण मिश्रा व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर येत्या १५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

दरम्यान, ‘आरे’ परिसरातील तोडलेल्या झाडांच्या बदल्यात किती नवी झाडे लावण्यात आली, तसेच किती झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले, याबाबतचा सद्यस्थितीजनक अहवाल न्यायालयास पुढील सुनावणीपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने मुंबई रेल्वे महामंडळाला दिले आहेत. न्यायालयाने वृक्षतोडीबाबत यापूर्वी दिलेल्या ‘जैसे थे’च्या आदेशाचे पालन करण्यात आल्याचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले.

आरेमधील प्रस्तावित कारशेडसाठी करण्यात आलेल्या हजारो वृक्षतोडीच्या विरोधात दाखल झालेल्या जनहितार्थ याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. यापूर्वीच्या सुनावणीत (ता. ७ ऑक्‍टोबर) न्यायालयाने आणखी झाडे तोडण्यास मनाई केली होती. आजच्या सुनावणीत मेट्रो कारशेडच्या बांधकामाला कोणतीही स्थगिती नसल्याचे सांगत न्यायालयाने कारशेडसाठी हिरवा कंदील दाखविला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SC extends stay on tree-cutting in Aarey forest