Tourism Capital : वाराणसीला मिळाला पर्यटन राजधानीचा दर्जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Varanasi tourism and cultural capital

Tourism Capital : वाराणसीला मिळाला पर्यटन राजधानीचा दर्जा

समरकंद : शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) येथील वार्षिक संमेलनामध्ये वाराणसी शहराला २०२२-२३ या वर्षासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानीचे नामांकन बहाल करण्यात आले आहे. या शहराला हा दर्जा मिळाल्यामुळे येथील स्थानिक पर्यटनाला चालना तर मिळेलच पण त्याचबरोबर ‘एससीओ’चे सदस्य देश आणि भारत यांच्यातील परराष्ट्र संबंध बळकट होऊन पर्यटन, सांस्कृतिक देवाणघेवाणही वाढेल असे सांगण्यात आले.

‘एससीओ’चे सदस्य असणाऱ्या देशांसोबतच्या प्राचीन व्यापारी संबंधांनाही या निमित्ताने उजाळा मिळाला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवदेनामध्ये नमूद करण्यात आले आहे. वाराणसीला हा दर्जा मिळाल्याने त्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमाला शांघाय सहकार्य संघटनेची अनेक नेते मंडळी, कलाकार उपस्थित राहतील.

मोदींनी मानले आभार

परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा म्हणाले की, ‘‘ एससीओच्या या निर्णयामुळे भारत आणि शेजारी देशांतील सांस्कृतिक आदानप्रदान वाढेल. काशीला हा बहुमान दिल्याबद्दल पंतप्रधानांनी संघटनेच्या सदस्यांचे आभार मानले आहेत. पुढील वर्षभर उत्तरप्रदेश सरकारच्या सहकार्याने काशीमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.’’

टॅग्स :TouristvaranasiTourism