सेंट्रल हॉलपेक्षा ग्रंथालयात बसा; अमित शहांचा नवनिर्वाचित खासदारांना सल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क 
रविवार, 7 जुलै 2019

सकारात्मकता व रचनात्मक विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवून संसदेत वावरले, तरच त्याचे मतदारसंघात प्रतिबिंब उमटते. 

- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री 

नवी दिल्ली : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बसून वेळ वाया घालविण्यापेक्षा "ग्रंथरत्नांची खाण' असलेल्या संसद भवनाच्या ग्रंथालयात बसून तसेच मंत्र्यांना भेटून मतदारसंघांतील प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करून वेळ सत्कारणी लावा, असा सल्ला भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवनिर्वाचित खासदारांना दिला आहे. 

लोकसभेतर्फे आयोजित केलेल्या खासदार कार्यशाळेत बोलताना शहा यांनी नव्या खासदारांना युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आदी या वेळी उपस्थित होते. नवीन लोकसभा ही तब्बल 267 नवीन व 78 महिला खासदार असलेली व बहुधा पहिलीच सर्वांत तरुण लोकसभा असेल, असे सांगून शहा यांनी सतराव्या लोकसभेची इतिहासात नोंद व्हावी, असे काम करावे, असे आवाहन केले. खासदार निधीच्या विनियोगाबाबत अत्यंत सावध राहिला नाहीत, तर नियमबाह्य पत्रे देऊन बसाल व तुम्हालाही कळणार नाही इतक्‍या झटपट तुम्ही बदनाम व्हाल, असाही त्यांनी इशारा दिला. 

ते म्हणाले, की लोकशाही ही पाश्‍चात्त्यांनी दिलेली देणगी, असे मी मानत नाही. कारण, भारतात बौद्धकाळापासून व त्याच्याही पूर्वी महाभारतापासून संसदीय प्रणाली अस्तित्वात आहे. भारतीय संसदेच्या भिंतींवर कोरलेले ऋग्वेद, उपनिषदे व सर्व धर्मांतील श्‍लोक व सद्‌वचने वहीत अर्थासह उतरवून फक्त वाचत राहिलात, तरी तुमची आदर्श खासदार बनण्याकडे वाटचाल सुरू होईल.

राजाजी व डॉ. राधाकृष्णन यांनी या श्‍लोकांची निवड किती दूरदृष्टीने केली होती, हेही तुमच्या लक्षात येईल. संसदेत व दिल्लीत आपली भाषा व आपले आचरण प्रसिद्धीसाठी नव्हे, तर संसदेची व स्वपक्षाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी पाहिजे, याकडे लक्ष द्या. दर शुक्रवारी खासगी विधेयकांवेळी गावी पळण्याची घाई करू नका व खासगी विधेयक या प्रकाराला "लाइटली' घेऊ नका. कारण, या खासगी विधेयकांत व्यवस्था बदलण्याची ताकद असते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seat in Library Amit Shah Advised to New Elected MP