
निवृत्तीनंतरही शक्य असेल तोपर्यंत नोकरी करण्याची ज्येष्ठांची इच्छा
मुंबई : हात-पाय थकले आता आराम करा, असे म्हणत साठी ओलांडलेल्या वृद्धांना नोकरीवरून नारळ देण्याची पद्धत आपल्याकडे रूढ आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन आणि कुटुंबावर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीला नकार देत निवृत्तीनंतरही शक्य असेल तोपर्यंत काम करण्याची इच्छा ४० टक्के ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे. हेल्पेज इंडियाच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाकडून मान्यता मिळालेल्या ‘जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिनाच्या’ (१५ जून) पूर्वसंध्येला ‘हेल्पएज इंडिया’ने ‘ब्रिज द गॅप : अंडरस्टँडिंग एल्डर नीड्स’ हा राष्ट्रीय अहवाल प्रसिद्ध केला. वृद्धापकाळातील उत्पन्न व रोजगार, आरोग्य व कल्याण, वृद्धांशी होणारे गैरवर्तन व त्यांची सुरक्षितता आणि वृद्धांचे सामाजिक व डिजिटल समावेशन यांमधील तफावत समजून घेण्यासाठी या सर्वेक्षणामध्ये सखोल अभ्यास करण्यात आला.
भारतातील २२ शहरांमधील ४,३९९ वृद्ध प्रतिसादक आणि २,२०० तरुण प्रौढ काळजीवाहक अशा नमुना आकारावर आधारित हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावर ४७ टक्के ज्येष्ठ नागरिक हे उत्पन्नाच्या स्त्रोतासाठी आपल्या कुटुंबावर अवलंबून आहेत, तर ३४ टक्के जण हे निवृत्तीवेतन आणि आर्थिक मदत यांवर अवलंबून आहेत. मुंबईत ७२ टक्के ज्येष्ठ नागरिक कुटुंबावर अवलंबून आहेत, तर १६ टक्के जण निवृत्तीवेतन व आर्थिक मदत यांवर अवलंबून आहेत.
सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार ७१ टक्के वृद्ध सध्या काही काम करत नाहीत. ३६ टक्के वृद्धांना काम करण्याची अजूनही इच्छा आहे आणि ४० टक्के जणांना शक्य असेल तोपर्यंत काम करायचे आहे. वृद्धांसाठी पुरेशा आणि सुलभ रोजगार संधी उपलब्ध नसल्याचे ६१ टक्के वृद्धांचे मत आहे. मुंबईतदेखील ७९ टक्के वृद्ध काम करीत नाहीत. येथील २६ टक्के वृद्ध निवृत्तीनंतरदेखील काम करण्यास इच्छुक आहेत.
Web Title: Senior Citizens Want To Work As Long As Possible Even After Retirement
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..