शरद पवारांना आज ‘ईडी’ कार्यालयात प्रवेशबंदी?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 September 2019

ठरल्याप्रमाणे आज (ता. २७) मी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात माहिती घेण्यासाठी जात आहे. कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये. सर्वत्र शांतता राखावी.

मुंबई - ‘ठरल्याप्रमाणे आज (ता. २७) मी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात माहिती घेण्यासाठी जात आहे. कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये. सर्वत्र शांतता राखावी. सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल  केले. दरम्यान, शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात आज प्रवेशबंदी केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Vidhan Sabha 2019 : गणेश नाईकांना मतदारसंघच नाही; नवी मुंबईवर भाजपचे स्पष्टीकरण

राज्य सहकारी बॅंकेतील कथित आर्थिक अनियमिततेप्रकरणी शरद पवार ‘ईडी’च्या रडारवर आले आहेत. शरद पवार यांनी थेट ‘ईडी’ कार्यालयात हजर राहून माहिती घेण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आज त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसह त्यांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. शरद पवार यांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी युवक, महिला व पदाधिकाऱ्यांसह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते या वेळी सोबत जाण्याचे संकेत आहेत.

‘ईडी’चे कार्यालय दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर या विभागात असून, हा संपूर्ण परिसर कॉर्पोरेट कंपन्यांच्या कार्यालयांचा आहे. या परिसरात सतत वर्दळ व रहदारी असते. शरद पवार यांना समर्थन देण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केल्यास या परिसरातील वाहतुकीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शांतता राखून कोणत्याही नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

Vidhan Sabha 2019 : अखेर ठरलं ! 'या' अटीवर होणार युतीची घोषणा

पोलिसांनीही याप्रकरणी संपूर्ण दक्षता घेण्याची तयारी केली असून, वाहतुकीवर परिणाम होणार नाही, यासाठीच्या उपाययोजना केल्या आहेत.

पवारांना प्रवेश नाकारणार?
नवी दिल्ली - शरद पवार यांना आज मुंबईतील ‘ईडी’च्या कार्यालयात प्रवेशबंदी केली जाण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या प्रकरणातील माहिती घेण्यासाठी पवार आज दुपारी दोन वाजता ‘ईडी’च्या कार्यालयात जाणार आहेत. मात्र, कोणत्याही व्यक्तीला किंवा आरोपीला प्रश्‍न विचारावयाचे की नाही, याचा निर्णय करणे हा चौकशी अधिकाऱ्याचा विशेषाधिकार असतो. तशी कारणे असतील, तर निर्णय केला जातो, अशी माहिती ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी दिली. शरद पवार यांना अद्याप बोलाविण्यात आलेले नाही. ‘गरज पडेल’ तेव्हा त्यांना प्रश्‍न विचारण्यासाठी आणि निवेदन नोंदवून घेण्यासाठी बोलाविले जाईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar today in ED office