
बजेट सादरीकरणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज देखील शेअर बाजारात घोडदौड तेजीत सुरु आहे.
मुंबई : काल एक फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारद्वारे केंद्रीय अर्थसंकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थमंत्री म्हणून तिसऱ्यांदा संसदेत बजेटचं सादरीकरण केलं आहे. काल बजेट सादरीकरणाच्या आधी, सादर करताना आणि सादर करुन झाल्यावर देखील शेअर बाजारात तेजी दिसून आली. बजेट सादरीकरणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज देखील शेअर बाजारात घोडदौड तेजीत सुरु आहे. आज देखील शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स 50 हजारांच्या पार गेला होता. सध्या तो 49 हजारांच्या वरच कामगिरी बजावत आहे. शेअर मार्केटमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील सेन्सेक्स तब्बल 1403 अंकांनी वधारला आणि त्यामुळे सेन्सेक्सने 50,004.06 चा टप्पा गाठला. अगदी याच पद्धतीने निफ्टी-50 मध्ये वृद्धी दिसून आली. निफ्टी 406 अंकानी वरती येऊन 14,687.35 वर स्थिर झाला. यापूर्वी 21 जानेवारीला सेनसेक्स 223.17 अकांनी वाढून 50,015.29 वर स्थिरावला होता. तर निफ्टी 14,707.70 च्या स्तरावर गेली होती.
Sensex touches 50,000-mark, currently trading at 49,945.91
— ANI (@ANI) February 2, 2021
आज अगदी सकाळीच शेअर मार्केट उघडल्यानंतर 9.32 वाजताच्या सुमारास सेन्सेक्सने उसळी घेतली. सेन्सेक्स तब्बल 1335.46 अंकांनी वाढला आणि तो 49936.07 अंकांवर पोहोचला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी देखील 390.60 अंकांनी तेजी पकडून 14671.80 च्या टप्प्यावर गेला. आज 1027 शेअर्समध्ये तेजी दिसून आली तर 171 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तसेच जवळपास 46 शेअर्समध्ये कसलाही बदल दिसून आला नाही.
Sensex currently at 49,580.48; up by 979.87 points pic.twitter.com/dNp6TmT5Ak
— ANI (@ANI) February 2, 2021
काल सेन्सेक्स पाच टक्क्यांनी उंचावला होता. गेल्या 24 वर्षातील सर्वाधिक मोठी तेजी काल बजेटवेळी दिसून आली होती. 1 फेब्रुवारीला 2314.84 अंकाच्या वरती 48600 च्या स्तरावर बंद झाला होता. तर निफ्टी 646.60 अंकांनी वाढून 14281.20 च्या स्तरावर बंद झाला होता.