
महिला खासदारांसोबतच्या 'त्या' सेल्फीमुळे शशी थरूर ट्रोल; व्यक्त केली दिलगिरी
काँग्रेस खासदार शशी थरूर काहीनाकाही कारणांमुळे सतत चर्चेत असतात. ट्विटरवर शेअर केलेल्या एका सेल्फीमुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ६ महिला खासदारांसोबत काढलेला थरूर यांचा हा सेल्फी व्हायरल होत आहे. हा सेल्फी शेअर करताना त्यांनी दिलेल्या कॅप्शनमुळे त्यांना ट्रोल व्हावं लागलं.
सेल्फी शेअर करताना काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, "कोण म्हणतं लोकसभा ही कामासाठी आकर्षक जागा नाही?" या सेल्फीमध्ये काँग्रेसच्या खासदार प्रनीत कौर आणि जोथिमनी, टीएमसीच्या खासदार नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, द्रमुकच्या खासदार थामिझाची थंगापांडियन दिसत आहेत.
हेही वाचा: Viral Video:अतिउत्साहाने माकडा सोबत सेल्फी काढणं पडलं महागात
दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शशी थरुर यांनी शेअर केलेल्या सेल्फीवर नेटकरी संतापल्याचे दिसत आहे. या फोटोवर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. थरूर यांचं ट्विट शेअर करताना वकील करुणा नंदी म्हणाल्या की, "शशी थरूर यांनी निवडून आलेल्या राजकीय नेत्यांना त्यांच्या दिसण्यापुरते मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि स्वतःला केंद्रस्थानी दाखवले आहे."
याशिवाय मोनिकाच्या नावाच्या एका ट्विटर युजरने कमेंट करताना म्हटलंय की, 'मला खात्री आहे की, उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ रावत यांच्या फाटलेल्या जीन्सच्या वादाप्रमाणे या उघड लैंगिकतेवर डाव्या उदारमतवाद्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया येणार नाही.'
ट्विटर युजर अलिशा रहमान सरकार खोचक प्रतिक्रिया नोंदवताना म्हणतात की, 'हे बरोबर आहे, ग्लॅमर वाढवण्यासाठी महिला लोकसभेत निवडून येतात. यामुळेच काही पक्ष महिला आरक्षण विधेयकासाठी आग्रही आहेत. मूर्खपणा!' दुसरीकडे, 'महिला लोकसभा आकर्षक करण्यासाठी सजावटीच्या वस्तू नाहीत, त्या खासदार आहेत आणि तुम्ही त्यांचा अपमान करत आहात', असंही एका ट्विटर युजरने म्हटले आहे.
ट्रोल झाल्यानंतर थरूर यांची दिलगिरी
दरम्यान, ट्विटरवर ट्रोल झाल्यानंतर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी माफी मागितली आहे. त्यांनी ट्विटमधून म्हटलंय की, 'महिला खासदारांसोबत हा सेल्फी विनोदाच्या उद्देशाने होता आणि त्यांनीच मला ट्विट करण्यास सांगितले, लोकांना याचं वाईट वाटलं याची मला खंत वाटते. परंतु मला सौदार्हपूर्ण वातावरणात काम करायला आवडतं. इतकंच...'
Web Title: Shashi Tharoor Trolled Due To The Selfie With Women Member Of Parliment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..