esakal | राष्ट्रहिताच्या नजरेतून : जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना तीन प्रश्‍न
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

राष्ट्रहिताच्या नजरेतून : जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना तीन प्रश्‍न

sakal_logo
By
शेखर गुप्ता

पंतप्रधान मोदी यांचा पराभव होऊ शकतो का? जर होय तर कसा, आणि त्यांना पराभूत कोण करू शकते....हे प्रमुख प्रश्न आहेत. २०२४ मध्ये मोदी यांना पराभूत करण्यासाठी जे नेते स्वप्न पाहत आहेत, प्रयत्नशील आहेत त्या नेत्यांनी या प्रश्नांची उत्तरे देण्याची आवश्यकता आहे.

काही दिवसांपासून तालिबान आणि अफगाणिस्तान यांच्या घडामोडींभोवतीच जगातील माध्यमे फिरत आहेत. आपल्याकडेही माध्यमांतून हाच विषय चर्चिला गेला. आपण राष्ट्रीय राजकारणातील घडामोडींकडे पाहू. अशावेळी तीन प्रश्न उपस्थित करू इच्छितो. मात्र, पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय तिसरा प्रश्न तुमच्यासमोर मांडणे अप्रस्तुत आहे. त्यामुळे त्याकडे सावधपणे पाहू...

नरेंद्र मोदी यांना पराभूत करता येऊ शकतो का? त्यांच्याभोवती कसले भक्कम कवच आहे का? ज्यामुळे त्यांना पराभूत करता येणार नाही, असे वाटते. दुसरे म्हणजे जर त्यांना पराभूत करता येत असेल तर ते कसे करता येईल? त्यासाठी काय लागेल? एक चेहरा...एक घोषणा...एक जाहीरनामा...एक विचारधारा की हे सर्व. तिसरे म्हणजे खरेच मोदी यांना हरविण्याचा प्रयत्न कोणी करत आहे का? सर्वांनी मनाला प्रश्न विचारावा आणि हे शक्य आहे का हे पाहा. विरोधी पक्षातील नेत्यांपैकी राष्ट्रीय पातळीवर मोदींना कोण पराभूत करू शकेल का?

देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष राहुल गांधी यांच्याकडे आहे...त्यामुळे ते मोदींना पराभूत करू शकतील, असे कोणी सांगेल....पण खुद्द राहुल गांधी त्यासाठी तयार आहेत का? त्यांचा काँग्रेस पक्ष तयार आहे का? मोदी यांना पराभूत करण्यासाठी, त्यांना आव्हान देण्यासाठी पक्षाकडे चेहरा, घोषणा, घोषणापत्र किंवा विचारधारा आहे का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच काँग्रेसला चिमटा काढला. काँग्रेसची अवस्था जुन्या सरंजामदारांसारखी झालेली आहे. ज्यांनी जमिनी गमावल्या आहेत, मात्र त्यांचा जीव हवेलीत अडकलेला आहे आणि ते सांभाळण्याची त्यांची क्षमता नाही. पण कॉंग्रेस पक्षाने इतर पक्षांना संपताना पाहिले आहे आणि सरंजामदारांप्रमाणे पुनरुज्जीवित होताना पाहिले आहे. भारतात आणि जगभरातील इतर लोकशाही देशांत असे होताना दिसलेले आहे.

बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे उत्पादन देण्यासाठी मनात शंका असता कामा नये.काँग्रेसची सध्याची अवस्था अशीच संभ्रमित आहे. नेमकी कोणती विचारधारा यशापर्यंत नेईल यासाठी चाचपणी सुरू आहे. कट्टर धर्मनिरपेक्ष की काहीसे हिंदुत्ववादी की डावीकडे झुकायचे की तटस्थ राहायचे की अन्य मार्ग अवलंबायचा...की गरिबी हटाओ....किंवा चौकीदार चोर है...अशी घोषणा अंगीकारायची...पण असे करूनही हाती काही लागेल का? काही हाती लागण्यासाठी काँग्रेसला अनेक गोष्टी स्वीकाराव्या लागतील...जसे की पक्ष संकटात आहे याची सर्वात प्रथम जाणीव ठेवावी लागेल. जनाधार सुधारण्यासाठी पारंपरिक मतदार सांभाळावे लागतीलच; पण त्याचबरोबर नवे मतदारही कायमस्वरूपी जोडले जातील, हे पाहावे लागेल. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांतील पराभवावेळीही २० टक्के मतदार सोबत होतेच. त्यातील किती सोबत आहेत...किती गळाले, हे कटाक्षाने पाहावे लागेल. तमिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये लोकसभेच्या सर्वात जास्त जागा आहेत आणि देशाच्या सत्तेच्या यशाचा मार्ग या पाच राज्यांतूनच जातो.

उत्तर प्रदेश भाजपच्या सत्तेचे हृदय आहे. येथील प्रबळ विरोधक म्हणजे मायावती; मात्र त्या कट्टरपणे विरोध करतील की नाही, याबाबत शाश्वती देता येत नाही. मोदींसोबत लढण्याची ताकद स्वभावानुसार दोन नेत्यांमध्ये आहे. ते दोन नेते आहेत...ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल. केजरीवाल यांच्याबाबत असे म्हणणे थोडे घाईचे आहे...मात्र त्यांच्या हातात वय आहे. सध्यातरी ते वयाने सर्वात लहान नेते आहेत...दुसरे आणखी एक नेते आहेत योगी आदित्यनाथ, मात्र ते भाजपमध्येच आहेत, त्यामुळे ते कितपत आव्हान देऊ शकतील, हे पाहावे लागेल. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये मोदी आणि शहा जोडीचा केलेला पराभव हा नक्कीच मोठा आहे. केजरीवालांनी दिल्लीत केलेल्या पराभवापेक्षाही मोठा आहे. ममता मोदींसोबत तीव्रपणे लढा देत आहेत. ममता जरी लढा देऊ शकत असल्या तरी त्यांच्यापुढे मर्यादाही आहेत. केवळ बंगालमधील विजयाच्या जोरावर राष्ट्रीय नेतृत्वाची उडी घेणे आव्हानात्मक आहे.

मग आम्ही उपस्थित केलेल्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर कोण देऊ शकेल? मोदींना पराभूत करणारे बरेच आहेत; मात्र त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात. महाराष्ट्राप्रमाणे काहींनी एकत्र येऊन भाजपकडून सत्ता मिळविण्याची ताकद असेल; पण राष्ट्रीय पातळीवर मोदींना पराभूत करण्याएवढी ही ताकद नक्कीच नाही. ही किमया २० टक्के भांडवल असलेली काँग्रेस करू शकेल. मात्र ते स्वतःला बदलू शकले तर...मोदींना विश्वासार्हपणे आव्हान देण्याची शक्यता असणाऱ्यांमध्ये ते त्यांचे मत गुंतवतील काय़? मोदींच्या पराभवासाठी सर्वप्रथम सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे...त्यांच्याविरोधात इगो विसरून एकत्र येणे...सर्व ताकद पणाला लावणे...भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत तो पक्ष कमकुवत करणे यासाठी प्रयत्न करणे....विशेषतः उत्तर प्रदेशात त्यांच्या शक्तिस्थानांवर हल्ला करणे जमले तरच मोदींना पराभूत करणे शक्य आहे.

कोणीही पराभूत होऊ शकते...

लोकशाहीत कोणीही पराभूत होऊ शकते, हे सर्वप्रथम ध्यानी घ्यायला हवे. इंदिरा गांधी, डोनाल्ड ट्रम्प, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांना लोकप्रियतेच्या शिखरावर असताना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असली तरी त्यांचे गृहित धऱणे त्यांना भोवले होते. यामधील सर्वात समान गोष्ट म्हणजे त्यांचा पराभव इतर कोणी आव्हान देऊन केला नाही तर त्यांच्यामधील गैरसमज, भागीदारांचे केलेले नुकसान आणि हेकेखोरपणा यांनी केला.

मोदी स्वतःच स्वतःचा पराभव करतील, या आशेने विरोधक बसणार आहेत का? पण तसेही सध्यातरी दिसत नाही. त्यांचा पक्ष तळागाळातल्या लोकांशी संवाद साधत आहे, त्यांच्यासाठी जेवढे म्हणून करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. प्रत्येक राज्यात प्रचार करताना जणू जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे, अशा पद्धतीने निवडणूक लढत आहेत. पराभव झाला तरी मागे हटत नाहीत. तिसऱ्या आघाडीची चर्चा होते तेथे मोदींनाच पुढे चाल मिळत आहे. काँग्रेसमध्ये युती करायची का, तिचे नेतृत्व कोणी करायचे, यावरच विचारमंथन होते...गेले दोन वर्षे पक्षाला स्वतःचे नेतृत्वच मिळालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

अनुवाद : प्रसाद इनामदार

loading image
go to top