राष्ट्रहिताच्या नजरेतून : भारतीय क्रिकेटमधील ‘नीलक्रांती’

भारतीय क्रिकेट संघाच्या सुमारे दोन दशकांच्या वाटचालीची ही कथा. १९८३ मध्ये मिळालेल्या क्षणिक विजयाची ही कथा नव्हे. भारतीय क्रिकेटमध्ये काही व्यवस्थात्मक बदल घडवून आणले आहेत.
Indian Cricket Team Bowlers
Indian Cricket Team BowlersSakal

भारतीय क्रिकेट संघाच्या सुमारे दोन दशकांच्या वाटचालीची ही कथा. १९८३ मध्ये मिळालेल्या क्षणिक विजयाची ही कथा नव्हे. भारतीय क्रिकेटमध्ये काही व्यवस्थात्मक बदल घडवून आणले आहेत. वेगवान गोलंदाजी, खेळाडूंची तंदुरुस्ती, क्षेत्ररक्षण हे या बदलाचे प्रमुख तीन आधारस्तंभ आहेत.

यंदाची क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा सुरू झाल्यावर क्रिकेटप्रेमी आणि विश्लेषक या दोघांकडूनही भारतीय क्रिकेट संघाबद्दल समान प्रतिक्रिया आली आणि ती म्हणजे, ‘‘२०१३ मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेव्यतिरिक्त गेल्या दशकभरात भारताने एकही आयसीसी(आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती) विश्वकरंडक जिंकलेला नाही. प्रत्येकवेळी भारतीय संघ उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत येऊन पराभूत झालेला आहे.

२०१७ मध्ये तर पाकिस्तानच्या संघाकडूनही भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. याचा अर्थ असा की, भारतीय संघाच्या पायाभूत रचनेतच काहीतरी गडबड आहे.’’ त्यामुळेच, क्रीडा विश्लेषक जसे कठोरपणे क्रिकेट संघावर टीका करतात, त्याचप्रमाणे क्रीडाप्रेमी देखील अत्यंत चंचल आणि अस्वस्थ होतात. आणि या भावनिक गदारोळात दोघांकडूनही खरी कथा लक्षात घेणे म्हणजेच, वस्तुस्थिती समजून घेणे राहून जाते.

ही कथा आहे भारतीय क्रिकेट संघात झालेल्या क्रांतिकारी बदलांची. जे बदल होऊ शकतील याची आमच्या पिढीने कधी कल्पनाही केली नव्हती. विशेष म्हणजे ही क्रांती केवळ प्रकाशझोतात असणाऱ्या दोघातिघा फलंदाजांपुरती मर्यादित नसून, आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातील सर्वात आक्रमक व वेगवान गोलंदाजी विकसित केल्यामुळे झाली आहे. वेगवान गोलंदाजी, खेळाडूंची तंदुरुस्ती आणि उत्कृष्ट क्षेत्र रक्षण हे या क्रांतीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत.

दीर्घकाळापासून भारतीय क्रिकेट संघ विश्वकरंडक का जिंकू शकला नाही? यासाठी कोण दोषी होते? भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, निवड समिती, संघातील खेळाडू की सर्वच? सामान्यपणे या पराभवासाठी ‘आयपीएल’ला जबाबदार धरले जाते. ‘आयपीएल’मुळे संघातील शिस्त मोडली. त्याचप्रमाणे देशासाठी खेळण्याची संघभावना कमी झाली असे मानले जाते.

याहून वाईट म्हणजे ‘आयपीएल’मुळे, या आधी राष्ट्रभावनेने खेळणारे खेळाडू, आता पैशांसाठी लाचावलेले, दिखावा करण्यावर अधिक भर देणारे आणि देशाच्या गौरवापेक्षा स्वतःवर लावल्या जाणाऱ्या बोलीवर अधिक लक्ष असलेले खेळाडू झाले असल्याचे चित्र उभे राहिले. परंतु, भारतीय क्रिकेट संघाची क्षमता जोखण्याचा आणखी एक पर्याय यापूर्वी देखील होता आणि आताही आहे.

तात्पुरत्या स्वरूपात हे विसरून जा की आपल्या संघाने दशकभरात एकदाही विश्वकरंडक जिंकलेला नाही. आणि आता हे लक्षात घ्या की हा तोच संघ आहे जो क्रिकेट सामन्यांच्या तीनही प्रकारात आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. जरी काही लोकांना या बाबतही शंका असेल तरी त्यामुळे वास्तव बदलत नाही.

मागील दोन दशकांपासून आपल्या संघाने या क्रमवारीत सातत्याने अग्रक्रमावर राहण्याची आपल्याला सवय झाली आहे. त्यामुळेच तर, या क्रमवारीत भारतीय संघाची घसरण झाल्यास प्रेक्षक निराश होतात. तूर्तास आपण याबाबतीतील काही आकडेवारी पाहुयात.

कसोटी सामन्यांच्या क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघ २००९ मध्ये पहिल्यांदा अग्रस्थानी पोहोचला. भारतीय क्रिकेट संघाने कसोटी खेळायला सुरुवात केल्यानंतर ७७ वर्षांनी आपल्या संघाला हे यश मिळाले होते. अर्थात त्यानंतर आपल्या संघाने सात वेळा कसोटी सामन्यांच्या क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळविला होता. आणि याचा एकूण कालावधी पाहिल्यास तो जवळपास ७० महिने अर्थात सहावर्षांचा आहे.

या ७० महिन्यांपैकी जानेवारी २०१६ ते जानेवारी २०२२ या कालावधीतील४९ महिने आहेत. जानेवारी२०२२ ते मे २०२३ या कालावधीत ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतीय संघाला पिछाडीवर ठेवत प्रथम क्रमांक पटकावला. परंतु त्यानंतर पुन्हा भारतीय संघाने आपले अग्रस्थान मिळवले. भारतीय क्रिकेट संघ असा संघ आहे ज्याने दीर्घ काळानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला सलग चार मालिकांमध्ये पराभूत केले आहे. यापैकी दोन ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर आणि दोन भारतात खेळल्या गेल्या होत्या.

एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत जानेवारी २०१३ मध्ये आपला संघ पहिल्यांदा प्रथम क्रमांकावर पोहोचला. मुंबई येथे झालेला विश्वकरंडक जिंकल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी हे यश भारतीय संघाच्या पदरात पडले. त्यानंतर आठ वेळा भारतीय संघ या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर राहिला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला काही काळ पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांच्या संघांनी एकदिवसीय सामन्यातील भारतीय संघाचे प्रथम स्थान हिसकावून घेतले होते. ‘टी -२०’ या प्रकाराबद्दल बोलायचे झाल्यास, या प्रकारात जरी भारताचे वर्चस्व फारसे दिसले नाही तरीदेखील२०११ नंतर भारतीय संघाने या ‘टी-२०’ क्रमवारीत पाच वेळा प्रथम स्थान मिळवले आहे.

हे अगदी खरे आहे की सामन्यांच्या मालिकेत अंतिम सामन्यातील तुमची कामगिरी हीच त्या मालिकेचे तुम्ही विजेते आहात की नाही हे निश्चित करते. इथे तुमची क्रमवारी उपयोगी पडत नाही आणि ही गोष्ट भारतीय संघ सोडून आणखी कोणाला अधिक चांगल्या पद्धतीने माहीत असेल?

क्रिकेट जगतातील स्थित्यंतर

१०८३ मध्ये भारताने विश्वकरंडक तेव्हापासून आतापर्यंत क्रिकेट जगतामध्ये मोठ्या उलथापालथी झाल्या आहेत. काही अत्यंत नाट्यमयदेखील आहेत. इतिहासात पहिल्यांदाच विश्वकरंडकासाठी वेस्टइंडीज क्रिकेट संघ पात्रता फेरीतून बाहेर फेकला गेला. याउलट अफगाणिस्तानने चमकदार कामगिरी करून दाखवली. तर नेदरलँडच्या संघाने देखील दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत आपले अस्तित्व दाखवून दिले.

क्रिकेट जगतामध्ये स्वतःचे वर्चस्व दाखविण्याचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वेगवान गोलंदाजी आणि यामध्ये भारताने प्रचंड सुधारणा केली आहे. ही क्रांती घडण्यासाठी भारतीय क्रिकेट संघात जे व्यवस्थात्मक बदल केले गेले. त्याचेच हे फलित आहे. यामुळेच क्रिकेटची बाजारपेठ आणि क्रिकेट जगतातील शक्ती केंद्र म्हणून भारत उदयास आला आहे.

‘प्रतिभाशाही’ चा उदय

भारतीय क्रिकेट संघाच्या यशामागील सर्वात मोठे कारण म्हणजे खऱ्याखुऱ्या ‘प्रतिभाशाही’ चा उदय. शाहरुख खानच्या जवान या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे आपल्या सर्वांना देशातील तथाकथित व्यवस्थेला दूषणे द्यायला फार आवडते. त्या अनुषंगानेच क्रिकेटमधील व्यवस्था काय आहे आणि तिला कशी दूषणे दिली जातात हे पाहू?

क्रिकेटमधील व्यवस्थापनावर केल्या जाणाऱ्या टीकेचे धनी सध्या जय शहा आहेत, पूर्वी अनुराग ठाकूर होते, त्याआधी शरद पवार, जगमोहन दालमिया, एन. श्रीनिवासन, माधवराव शिंदे, किंवा त्याआधी आय.एस. बिंद्रा हे होते. किंवा मग राजीव शुक्ला हे कायमच टीकेचे धनी होतात. हे कोणीही क्रिकेटपटू नाहीत, तर मग हे या खेळात काय करत आहेत, असा सवाल करत त्यांच्यावर टीका केली जाते.

इतकेच नव्हे सर्वोच्च न्यायालयाने देखील याबाबतीत हस्तक्षेप केला होता. अर्थात त्यांनीदेखील अनुराग ठाकूर यांच्याकडून व्यवस्था काढून घेत जय शहा यांच्याकडे दिली हा भाग अलाहिदा. भारतीय क्रिकेटला राजकीय नेते आणि उद्योजकांच्या कह्यातून मुक्त करण्यासाठी आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी क्रिकेटप्रेमी आणि प्रशासकीय व्यवस्थांनी देखील सर्वोच्च न्यायालयाला पाठिंबा दर्शवला. यात त्यांना यश आले नाही.

मात्र यामुळेच भारतीय क्रिकेट सुरक्षित राहण्यास मदत झाली. या सर्व उलथापालथी मधून देखील भारतीय क्रिकेटने गाठलेले यशोशिखर हे भारतीय क्रिकेटचे सामर्थ्य आणि त्याचे नियमन करणाऱ्या व्यवस्थेच्या कटिबद्धचे निदर्शक आहे. मग भलेही त्या व्यवस्थेवर कितीही टीका होवो. हे सर्व बदल घडवून आणण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला २० ते ३० कोटी रुपये खर्च करावे लागले.

यापैकी बहुतांश पैसे हे बीसीसीआयवरील देखरेखीसाठी नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या फीसाठी मोजावे लागले. परंतु यामुळे निष्पक्ष निवडीसह आलेली गुंतवणूक आणि त्यातून क्रिकेटसंघाचा विकास ही सर्व प्रक्रिया निष्पक्ष होऊ लागली. ज्याचे परिणाम आपण पाहत आहोत. भारतीय क्रिकेट संघात होणारी निवड ही देशातील अन्य कोणत्याही क्षेत्रातील होणाऱ्या निवडी पेक्षा अत्यंत निष्पक्ष आणि केवळ प्रतिभेच्या आधारावर केली जात आहे.

राजकीय क्षेत्र, सरकारी क्षेत्र, कॉर्पोरेट क्षेत्र आणि इतकेच नव्हे तर न्यायपालिकेतील निवडीपेक्षाही ही निवड निष्पक्ष आहे. त्यामुळेच तर मागील कित्येक काळापासून आपण निवड प्रक्रियेमध्ये काही गैर झाल्याचे अथवा त्याबद्दल काही वादंग निर्माण झाल्याचे ऐकलेले नाही.

याचे कारण म्हणजे जे कोणी संचालक आहेत त्यांना याची पूर्ण जाणीव झालेली आहे की निवड प्रक्रियेत काही गडबड झाली आणि त्यातून संघाच्या कामगिरीवर काही परिणाम झाला तर त्याची शिक्षा क्रिकेटची बाजारपेठ त्यांना देणार.

तुम्ही गुगलवर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंची जात धर्म प्रादेशिक अथवा भौगोलिक स्थिती काय आहे हे सर्च करून पहा, तुम्हाला शून्य माहिती मिळेल. भारतीय क्रिकेट संघाइतकी वैविध्यता अन्य कोणत्याच व्यवस्थेमध्ये सध्या पाहायला मिळत नाहीये आणि तिथे प्रत्येक जण हा केवळ त्याच्या प्रतिभेवरच आलेला आहे.

प्रतिभा आणि क्षमता या दोन निकषांवर ठामपणे उभारलेल्या या व्यवस्थेचे हे फळ आहे की भारतीय क्रिकेट संघातील विविधता ही केंद्रीय मंत्रिमंडळ असो किंवा अन्य व्यवस्था असोत त्या सर्वांहून देशाच्या वैविध्यतेचे व प्रतिभेचे सर्वोत्कृष्ट असे एकत्रित प्रतिनिधित्व करत आहे. भारतीय संघाच्या माध्यमातून एक संदेश अत्यंत सुस्पष्टपणे दिला जात आहे आणि तो म्हणजे, प्रतिभा ही शिखरावर पोहोचण्यासाठी तिचा मार्ग शोधतेच.

त्यामुळे प्रतिभेला महत्त्व देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे केवळ बाजारपेठच प्रतिभेला चांगला वाव देऊ शकत आहे. त्या व्यतिरिक्त कोणताही सरकारी आदेश किंवा न्यायालयीन हस्तक्षेप प्रतिभेला वाव देऊ शकेलच असे नाही, हेच क्रिकेटने सिद्ध केले आहे.

(अनुवाद - रोहित वाळिंबे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com