Voting
VotingSakal

राष्ट्रहिताच्या नजरेतून : विविधतेतील राजकारण

भारतीय आणि त्यांच्या धर्मभोळेपणाबद्दल ‘प्यू’ने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणानंतर वृत्तपत्रांत अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि वादही झडले.

संभ्रमित, गोंधळलेल्या, सेक्युलरवादात गुरफटलेल्या विरोधकांनी अख्खा धर्म भाजपच्या हवाली केला आहे आणि म्हणूनच नरेंद्र मोदींचे विरोधक त्यांना आव्हान देण्यास अपयशी ठरले आहेत. भारतीयांच्या धर्मभोळेपणावर पीईडब्ल्यूने (प्यू) केलेल्या सर्वेक्षणातून हेच सांगण्यात आलंय.

भारतीय आणि त्यांच्या धर्मभोळेपणाबद्दल ‘प्यू’ने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणानंतर वृत्तपत्रांत अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि वादही झडले. प्रश्न असा आहे, की हे सर्वेक्षण देशातील राजकीय स्थितीबद्दल आपल्याला काही शिकवते का, यासंदर्भात आजवर झालेली चर्चा अधिकतम समाजशास्त्राच्या परिमाणांतच झडली. विविध श्रद्धा बाळगणारे धार्मिक भारतीय कसे आहेत? इतरांप्रति त्यांच्या मनात किती आदर आहे? शेजाऱ्यांविषयीचा त्यांचा दृष्टिकोन, राष्ट्रवाद आणि जेवणखाण काय आहे? पण, भारतात तुम्ही निवडणुका कशा जिंकता, मतदारांना काय सांगता, कोणत्या भाषेचा वापर करून तुमचे म्हणणे त्यांच्या गळी उतरवता, यांसारख्या प्रश्नांची उत्तरे त्यातून मिळाली आहेत का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपला या प्रश्नांची उत्तरे ठाऊक आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रश्न विचारण्याचा प्रश्नच नाही. मोदी यांच्या निवडणूक सिद्धांताच्या भिंतीवर डोके आपटणाऱ्या आणि आपण याआधी काय म्हणालो होतो, यावर खोल विचार करणाऱ्यांसाठी हा प्रश्न आहे. मोदींच्या नावाचा वापर न करता निवडणूक लढवली जात असेल, तर भाजपला नमवणं शक्य आहे, हे त्यांना माहीत आहे. पश्चिम बंगाल हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तथापि, केंद्रातील सत्ता बळकावून मोठे बक्षीसही मिळवता येईल; तरीही विरोधकांच्या कह्यात असलेलं आव्हान ते मोदींसमोर का उभे करू शकले नाहीत?

‘प्यू’च्या सर्वेक्षणातून अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला सापडतील, की जी बातम्यांच्या मथळ्यांच्या पलीकडे जाऊन शोधता येतील. यातील काही उत्तरे परस्पर विसंगत विधानांतूनच मिळतील. आणि हो, या सर्वेक्षणातील म्हणणं उण्यापुऱ्या ३० हजार लोकांचंच आहे, या वादाला तत्काळ मूठमाती द्या. सर्वेक्षणाची रीती जोमदार असेल, तर संख्येच्या गणिताची तमा बाळगण्याची गरज नाही. निवडणुकीत मतदार कोणाला मत देतात, ते देण्यापर्यंत त्यांची विचारप्रक्रिया काय असते, याचे शास्त्र जाणणारा तज्ज्ञ अर्थात सेफॉलॉजिस्ट संजय कुमार सांगतात, की २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीतही तर्कसंगतीचा जवळपास गळा घोटणाऱ्या भाषणांचा, विधानांचा ‘प्यू’च्या सर्वेक्षणात अभ्यास करण्यात आला होता. आता यात मोदी लाटेचा विचार बाजूला ठेवा. त्यातील महत्त्वाच्या तर्कविसंगतीच इथे घेऊ या. पहिली, सर्व भारतीयांच्या धर्मभावना खोल असतात आणि इतरांच्या श्रद्धेप्रति ते तितकेच सहिष्णू असतात.

दुसरे ते धार्मिक आहेत, हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रमुख ओळख आहे. तोच त्यांचा आधार आहे; परंतु इतरांसाठी असे धार्मिक असणे म्हणजे राष्ट्रवादी असणे अशी अपेक्षा करता येणार नाही. तिसरं असं आहे, की त्यांच्या श्रद्धा जाहीर करणं हे त्यांना जरुरीचं वाटतं आणि राष्ट्रवादी ही त्यांची जबाबदारी आहे. त्याच वेळी इतर श्रद्धा बाळगणाऱ्यांविषयी आदर राखणं; तरीही त्यांच्या एक तृतीयांश लोकांना त्यांचा शेजारी इतर धर्माचा असावा, असे वाटत नाही. चौथं, डाव्यांना मतदान करणाऱ्यांपैकी ९७ टक्के श्रद्धाळू आहेत. आणि पाच, इतर धर्माच्या, श्रद्धांच्या लोकांवर त्यांचे जरी प्रेम असले, तरी वा ते देशभक्तीची भावना एकमेकांमध्ये पाहत असले, तरी त्यांच्या धर्मातील कुण्याही व्यक्तीला इतर धर्मातील व्यक्तीशी विवाह करण्याचा अधिकार नसेल. इथे हीच भावना त्यांच्या धर्मातील जातिव्यवस्थेलासुद्धा लागू पडते.

सर्वेक्षणातील या विदेतील (डाटा) पाच महत्त्वाचे मुद्दे पाहिल्यास काय दिसते? एक, भारतीय हे पूर्णतः सेक्युलर आहेत; मग ते धर्मभोळे आहेत म्हणून नाही, तर ते मुळातच सेक्युलर आहेत. दुसरे, त्यांचा या गोष्टीवर विश्वास नाही, की इतर श्रद्धा बाळगणारे वा विशिष्ट श्रद्धा बाळगणारे लोक देशाशी एकनिष्ठ नसतात. कारण ते जर का तसे असते, तर त्यांनी त्यांचा आदर केला नसता. तिसरे, माझा शेजारी हा माझ्या श्रद्धांशी मिळताजुळता असेल, तरच तो माझा शेजारी असेल. मग त्याची संस्कृती, विधी, सण आणि सर्वात महत्त्वाचे त्याचा आहार माझ्या श्रद्धांशी समान असेल, तर ती व्यक्ती माझ्या समुदायाची आहे, असं मी समजेन.

इथे इतर श्रद्धा बाळगणाऱ्या व्यक्तीला शेजारी म्हणून सामावून घेण्यास विरोध करणाऱ्या जैनधर्मीयांची संख्या अधिक आहे. जैनांच्या अतिविशिष्ट आणि सक्तीच्या आहार निवडी आहेत. चौथं, मी डाव्यांना मतदान करीन; परंतु त्यांची देवरहित समाजाची कल्पना मला मान्य नाही. डाव्यांची नौका भारतीय समाजातील कमालीच्या असमानतेच्या पाण्यात तरण्याऐवजी बुडण्याचे हे एकमेव कारण आहे. आणि शेवटचा मुद्दा असा की, मला कोणत्याही धर्माच्या व्यक्तीबद्दल प्रेम आहे; पण आंतरधर्मीय विवाह मला मान्य नाहीत.

भारतातील विविधतेतील एकतेचा मला आदर आहे; पण त्यातील माझी वैविध्यपूर्ण ओळख मला जपायची आहे; तरीही एकता म्हणजे समानता नव्हे. अर्थात या दोन्ही शब्दांना एकमेकांशी जोडण्याचा कुणी प्रयत्न केलाच, तर मग माझं रक्त उसळून उठेल. हे सारं नरेंद्र मोदी कसं काय जुळवून आणतात? ते त्यांच्या तीक्ष्ण आणि बेधडक आवाहनाने हिंदू-भारतीय अस्मितेला हात घालतात. त्यांच्या या राजकीय चालीतून अल्पसंख्याक बाजूला सारले जातात. यात मुस्लिम असतात, हे वेगळे सांगायला नको. मग मोदी म्हणतात, त्यांनी आम्हाला कधीच मतदान केलेले नाही. माझ्या प्रिय हिंदुजनहो, तुमच्यातले सर्वाधिक हिंदू आम्हाला मत देणार आहेत की या भारतावर कोणी राज्य करायचे, हे ठरवण्याचा नकाराधिकार (व्हेटो) तुम्ही अल्पसंख्याकांच्या हाती सोपविणार आहात? हीच भाषा मतदारांना कळत असते. या आवाहनाला निम्म्याहून अधिक हिंदू मतदारांनी प्रतिसाद दिला, तर सत्ता त्यांच्या हाती असते.

पश्चिम बंगालमध्ये ही गरज ६० ते ६५ टक्क्यांहून अधिक होती. त्यामुळेच तर त्यांना तिथे अपयशाचे तोंड पाहावे लागले. मोदींच्या विरोधकांचे म्हणणे लोकांना ऐकायचे नसते. कारण ते लोकांना समजणार नाहीत, अशा भाषेत बोलत असतात. मोदींच्या विरोधकांची हीच भाषा लोकांना आवडत नसते. शेवटी कोण हिंदू आणि कोण सेक्युलर आहे, यातील गोंधळामुळे मोदींच्या विरोधकांना मोदींसमोर आव्हान उभे करता आलेले नाही.

आपलं काम भलं आणि आपण भलं

भारतीय, हे आपलं काम भलं आणि आपण भलं, इतक्याच वर्तुळात जगतात. त्यांना कोण आला, काय बोलून गेला, याचे काही देणेघेणे नसते. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे आणि त्याने वदलेल्या प्रत्येक शब्दामागे काय आशय दडलाय, हे ओळखण्याची अपेक्षा ठेवणं तर दूरच! तर मग त्यांना काय ऐकायला आवडतं? त्यांना आवडत असलेलं म्हणणं ते मनापासून ऐकतात. त्यांना ज्या भाषेत समजतं, त्या भाषेत सांगण्याचं कसब सांगणाऱ्याकडे असलं की झालं. मग ते अशा भाषेचा आदरही करतात. मोदींच्या भाषणातील कैक चुकाही त्याच्या ‘वर्मी’ लागत नाहीत.

(अनुवाद : गोविंद डेगवेकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com