Chandrayaan-3 Campaign
Chandrayaan-3 CampaignSakal

सोशल डिकोडिंग : ‘चांद्रयान-३’ आणि तुम्ही-आम्ही...

भारताचे चांद्रयान-३’ ता. चौदा जुलै २०२३ रोजी अवकाशात झेपावले आणि २३ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचले.

भारताचे चांद्रयान-३’ ता. चौदा जुलै २०२३ रोजी अवकाशात झेपावले आणि २३ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचले. या भागात पोचणारा भारत हा पहिला देश ठरला. सगळ्या भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहेच शिवाय जगाचेही लक्ष या मोहिमेकडे होते.

चांद्रयान मोहीम, उपग्रह चाचण्या, आण्विक चाचण्या, अंतराळ संशोधन इत्यादी संशोधन आणि उपक्रमांवर देशाचा निधी खर्च होत असतो. परिणामी या सगळ्यांचा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनमानावर काय परिणाम होतो किंवा होणे अपेक्षित आहे, याबद्दल मात्र आपल्याकडे पुरेशी जागरूकता नाही.

विज्ञानाने प्रगती केली. यामध्ये अंतराळ संशोधन महत्त्वाचे क्षेत्र बनले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९६२ मध्ये ‘भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समिती’ स्थापन करण्यात आली. या समितीचे नेतृत्व भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्याकडे होते.

त्यानंतर नोव्हेंबर १९६३ मध्ये भारताने पहिले रॉकेट लाँच केले आणि भारताच्या अंतराळ संशोधनाची सुरुवात झाली. पुढे १५ ऑगस्ट १९६९ ला भारतीय अंतराळ संशोधन समितीचे नामकरण ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ म्हणजेच ‘इस्रो’ असे करण्यात आले.

जगातील ६ अंतराळ संशोधन संस्थांपैकी इस्रो एक. अंतराळ संशोधन क्षेत्रात प्रगत देशांच्या रांगेत भारतानेही अवकाश संशोधन क्षेत्रात सहभाग नोंदवत यशस्वी कामगिरी गेल्या ५४ वर्षांत केली. त्यात उपग्रह निर्मिती, क्षेपणास्त्र निर्मिती, उपग्रह प्रक्षेपक निर्मिती अशा अनेक क्षेत्रात भारताने स्वदेशी तंत्रज्ञान अस्तित्वात आणून स्वयंपूर्णता प्राप्त केली. यशस्वी ‘मंगलयान’नंतर चांद्रयान १, चांद्रयान २ आणि आता चांद्रयान ३ मोहिमेला आपण देश म्हणून सामोरे गेलो आहोत.

या मोहिमांचा आणि संशोधनाचा परिणाम समजून घेतांना लक्षात घ्यायला हवं, की संरक्षण, दळणवळण आणि संवाद, कृषी - हवामान, उद्योग विकास अशा अनेक क्षेत्रात अंतराळ संशोधनाचा थेट परिणाम होत असतो.

विक्रम साराभाई यांचं लोकप्रिय वाक्य होतं, ‘आम्हाला खात्री आहे की जर आपल्याला राष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रांच्या समुदायामध्ये अर्थपूर्ण भूमिका बजावायची असेल, तर माणूस आणि समाजाच्या वास्तविक समस्यांसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आपण (भारताने) कोणाच्याही मागे नसावं.’

त्यांच्या याच विचारांना पुढे घेऊन जात लोकोपयोगी उपक्रमाचे उदाहरण द्यायचे, तर १९७५ मध्ये ‘नासा’च्या मदतीने इस्रोने केलेल्या ‘सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपरिमेन्ट’ – (साइट) नावाच्या उपक्रमाचा दाखला देता येईल. या कार्यक्रमात भारतातील २० जिल्ह्यांतील २४०० गावांमध्ये उपग्रहांच्या मदतीने दूरचित्रवाणीचे कार्यक्रम दाखविण्यात इस्रोला यश मिळाले होते. त्यातून साधलेला परिणाम असा, की दुर्गम भागात माहिती प्रसारण करणे भारताला शक्य झाले.

पुढे देशांतर्गत संदेशवहनासाठी ‘सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन एक्सपरिमेंट प्रोजेक्ट’ (STEP) प्रकल्पही इस्रोने यशस्वीरीत्या पार पडला. या प्रकल्पातून उपग्रहांच्या संदेश प्रसारणाचे तंत्र आत्मसात करण्यात आले आणि स्वदेशी उपग्रह निर्मितीला (INSAT) चालना मिळाली.

जागतिक बाजारपेठेत या क्षेत्रात स्पर्धा वाढते आहे. खासगीकरणाचे आव्हान आहे. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी अंतराळ संशोधन अधिक व्यापक करणे आणि त्यासाठी संशोधन संस्थांना बळ देणे येत्या काळात महत्त्वाचे असेल. नागरिक म्हणून देशाभिमानापलीकडे जाऊन आपण या मोहिमांकडे जागरूकपणे बघणे महत्वाचे वाटते.

अंतराळ संशोधनाला पूरक धोरणे आखणे, या धोरणांची कसोशीने अंमलबजावणी करणे, अंमलबजावणीचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळणे आणि त्याद्वारे केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवर रोजगाराच्या, व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होणे अशी रचना भविष्यकाळात लागणार आहे. चांद्रयान-३ चे यश अशा धोरणात्मक दृष्टिकोनातूनही पाहिले पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com