esakal | शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena

शिवसेनेच्या रोजच्या वाग्बाणांमुळे घायाळ झालेल्या दिल्लीतील भाजपश्रेष्ठींनी अखेर आज युतीच्या काडीमोडावर शिक्कामोर्तब केले.

शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना-भाजप युतीमध्ये सत्तास्थापनेवरून निर्माण झालेल्या अभूतपूर्व अशा तणावामुळे हे दोन्ही पक्ष परस्परांपासून दुरावले होते. शिवसेनेच्या रोजच्या वाग्बाणांमुळे घायाळ झालेल्या दिल्लीतील भाजपश्रेष्ठींनी अखेर आज युतीच्या काडीमोडावर शिक्कामोर्तब केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनीच राज्यातील युतीचा संसार मोडल्याचे अप्रत्यक्षरीत्या जाहीर करण्यात आले. शिवसेनेचे खासदार आता विरोधी बाकांवर बसतील, असे सूचक वक्तव्य भाजप नेते प्रल्हाद जोशी यांनी केले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

दुसरीकडे, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आपल्याला, ‘महाराष्ट्र में सब कुछ जल्दही ठीक होगा, आप चिंता मत करो,’ असे सांगितल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांना सांगितले. शिवसेना दोन्ही काँग्रेसबरोबर गेली, तर ते सरकार टिकणार नाही व मुळात काँग्रेसच शिवसेनेबरोबर जाणार नाही, असेही भाकीत त्यांनी केले. महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय स्थिती त्वरित संपली पाहिजे. कारण, शेतकरी मरत आहे, अशा शब्दांत आठवले यांनी थेट मोदींनाही साकडे घातले.

संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्पक्षीय बैठकीनंतर शब्दांचा खेळ करताना ‘युती तुटली’ असे थेट न सांगता, ‘शिवसेना खासदारांसाठी विरोधी बाकांवर बसण्याची व्यवस्था केली जात आहे,’ असे सांगून युती संपुष्टात आल्याचे स्पष्ट केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीत बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. सकाळी सर्वक्षीय बैठक, दुपारी एनडीए घटकपक्षांची बैठक; तर संध्याकाळी राज्यसभेतील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आणि या तीन बैठकांमध्ये नेत्यांच्या छोट्या-मोठ्या बैठकांचे सत्र संध्याकाळपर्यंत सुरूच राहिले. मात्र, सर्वांचे लक्ष होते शिवसेनासोबतची युती तोडण्याबाबत भाजप काय भूमिका घेते याकडे. जोशी यांनी ही संदिग्धता दूर केली व आता शिवसेनेचे राज्यसभेतील तिन्ही व लोकसभेतील १८ खासदार विरोधी बाकांवर बसतील, असे सांगितले.

संयोजक कोण?
दुसरीकडे, लोक जनशक्ती पक्षाचे नवे अध्यक्ष चिराग पासवान यांनी ‘एनडीए’मधील संयोजकपद त्वरित भरावे, अशी मागणी करून नव्या चर्चेला तोंड फोडले. वाजपेयी-अडवानी यांच्या काळात जॉर्ज फर्नांडिस व शरद यादव यांनी हे पद सांभाळले होते. मात्र, मोदीयुगात हे पद रिक्तच आहे. या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, गृहमंत्री व भाजपाध्यक्ष अमित शहा, राज्यसभेचे सभागृहनेते फारूक अब्दुल्ला तसेच सतीश मिश्रा, रामगोपाल यादव, अधीररंजन चौधरी, सुदीप बंडोपाध्याय, नवनीत कृष्णन, मंत्री आठवले, अनुप्रिया पटेल, चिराग पासवान यांच्यासह २७ सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. संसदेत सर्व विषयांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. अधिवेशन सुरळीत चालविण्यास विरोधकांनी सहकार्य करावे, असे पंतप्रधानांनी पुन्हा सांगितले.

संभ्रम दूर
मागच्या अधिवेशनात विक्रमी कामकाज झाले, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. संसदेतील सकारात्मक चर्चा नोकरशाहीलाही जागरूक ठेवते. त्यामुळे चर्चा व्हायला हवी, असे मोदी म्हणाल्याचे जोशी यांनी सांगितले. बैठकीनंतर जोशी यांना पत्रकारांनी घेरले. शिवसेनेशी युतीचे काय? या एकाच प्रश्नावर गलका केला. त्यावर जोशी यांनी ‘युती तुटली’ हे शब्द ओठांवर येऊ दिले नाहीत. मात्र, ते म्हणाले की,  एनडीएच्या बैठकीलाही ते (शिवसेना) आले नाहीत. त्यांच्या केंद्रातील मंत्र्यांनीही राजीनामा दिला आहे. त्यांच्यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी बाकांवर बसण्याची व्यवस्था केली जात आहे. त्यांच्या या उत्तरामुळे अनेकांच्या मनातील संभ्रम दूर झाला.

आझाद यांचा सवाल
दरम्यान, आजच्या बैठकीत आठवले महाराष्ट्रातील युतीसाठी कासावीस होत असताना गुलाम नबी आझाद यांनी काश्‍मीरमध्ये कैदेत असलेले खासदार फारूक व उमर अब्दुल्ला यांच्या सुटकेबाबतचा भेदक सवाल उपस्थित केला. अब्दुल्ला संसदेच्या अधिवेशनास उपस्थित राहू शकणार का नाही? असे त्यांनी विचारले. त्यावर मोदी-शहा यांनी नेमके काय उत्तर दिले का दिलेच नाही, याची माहिती समजू शकली नाही. काश्‍मीरसह बेरोजगारी, आर्थिक मंदी, शेतकऱ्यांची दैन्यावस्था व त्याबाबत केंद्राची उदासीन भूमिका, हे विषयही चर्चेला येणे अत्यावश्‍यक असल्याचे अधीररंजन चौधरी यांनी सांगितले.

सावंतांचे आसन गेले...
संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (ता. १८) सुरू होऊन १३ डिसेंबरपर्यंत चालेल. या अधिवेशनात विशेषतः लोकसभेतील १८ शिवसेना खासदार किती व कसे आक्रमक राहतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेसाठी विरोधी बाकांची व्यवस्था केल्याने मोदी-शहा यांनी शिवसेना हा विषय सध्यासाठी दिल्लीपुरता तरी संपुष्टात आणल्याचे मानले जात आहे. राज्यात नव्या आघाडीची जुळवाजुळव सुरू होताच शिवसेनेचे अरविंद सावंत यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले गेले व त्यांनीही तो दिला. याचा एक परिणाम असा होणार आहे, की सावंत यांना लोकसभेतील पहिल्या रांगेतील स्थान गमवावे लागणार आहे. त्यांना आता तिसऱ्या रांगेत बसावे लागेल. त्याचप्रमाणे अनिल देसाई यांनाही राज्यसभेतील मधल्या रांगेत सध्याच्या पेक्षा मागची जागा मिळेल, अशी चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची उद्या (ता. १८) भेट होणार असून, परवा म्हणजे मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होऊन सत्तास्थापनेबाबतचा निर्णय घेतला जाईल.
- नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले काही आमदार आणि अपक्षदेखील आमच्या संपर्कात आहेत, मात्र त्यांची नावे मी आताच उघड करणार नाही. भाजपची विचारधारा वेगळी असल्याने आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही.
- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
 

सगळी उत्तरे मिळतील, आम्हाला कुणी शहाणपणा शिकवू नये. आम्ही शिवसैनिक आहोत. स्वाभिमान, हिंदुत्व आदी मुद्द्यांवरची उत्तरे लवकरच मिळतील.
- संजय राऊत, नेते, शिवसेना

loading image