Viral Video:शिवाजी महाराजांची मूर्ती असलेल्या गाड्यांना बालाजीला प्रवेश 'नाही'च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

शिवाजी महाराजांची मूर्ती असलेल्या गाड्यांना बालाजीला प्रवेश 'नाही'च; पाहा व्हिडिओ

तिरूमला : आंध्रप्रदेशमधील प्रसिद्ध बालाजी मंदिराच्या गेटवरील एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. गाडीत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असल्यामुळे मंदिराच्या चेक पोस्टवरून मंदिर परिसरात प्रवेश न दिल्याचा दावा सदर भक्ताने केला होता. त्यानंतर मंदिर प्रशासन समितीने यावर स्पष्टीकरण देत, गाडीत शिवाजी महाराजांची मुर्ती असल्याचं कळल्यावर आम्ही प्रवेश दिल्याचं सांगितलं होतं पण या ठिकाणचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये तेथील कर्मचारी शिवाजी महाराजांची मूर्ती असलेल्या गाड्यांना मंदिराकडे जाण्यास मनाई करताना दिसत आहेत.

अक्षय बोऱ्हाडे असं या भाविकाचं नाव असून त्यांच्या गाडीत शिवाजी महाराजांची मुर्ती असल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. दरम्यान ज्या गाड्यांवर शिवाजी महाराजांचे फोटो किंवा मूर्ती आहेत त्यावर त्या देवस्थानचे स्टिकर विकत घेऊन चिकटवण्यास सांगण्यात येत असल्याचं या व्हिडिओत अक्षय बोऱ्हाडे यांनी सांगितलं आहे.

तेथील चेक पोस्टवरील एका कर्मचाऱ्याला विचारले असता, दुसऱ्या कोणत्याही देवीदेवतांचे फोटो नेण्यास बंदी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलायला गेल्यावर चर्चा करत असताना कॅमेरा हिसकावून घेतल्याचा आरोप बोऱ्हाडे यांनी केला आहे. त्याचबरोबर पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आम्हालाही विश्वास बसला नव्हता पण इथे खूप भयंकर प्रकार असून आम्ही आमच्या गाडीवर असलेला महाराजांचा फोटो झाकणार नसल्याचं अक्षय बोऱ्हाडे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितलं.

दरम्यान, प्रत्येक धर्माच्या लोकांच्या श्रद्धा असतात, मग कोणत्याही धर्मातील देवांच्या फोटोमुळे प्रवेश नाकारणे हे चुकीचं आहे. प्रत्येकजण आपली जातधर्म पाळत असतो पण अशा मोठ्या देवस्थानावरील आमच्या राजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही अशी खंत अक्षय बोऱ्हाडे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे आम्ही तिरूपती बालाजींचं दर्शन न घेता परत जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

Web Title: Shivaji Maharaj Idol Vehicle Not Entry At Tirupati Balaji Temple Viral Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..