शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीचे महत्व काय?

rashta munch
rashta munch
Summary

भाजपला रोखण्यासाठी देशात तिसरी आघाडी स्थापन होण्याच्या चर्चांना उधाण आलंय. कारणही तसंच आहे. २२ जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राजकारणातील सर्वाधिक अनुभवी नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी 'राष्ट्रमंच'ची बैठक पार पडली.

नवी दिल्ली- भाजपला रोखण्यासाठी देशात तिसरी आघाडी स्थापन होण्याच्या चर्चांना उधाण आलंय. कारणही तसंच आहे. २२ जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राजकारणातील सर्वाधिक अनुभवी नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी 'राष्ट्रमंच'ची बैठक पार पडली. विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेसचा कोणताही नेता उपस्थित नव्हता, त्यामुळे काँग्रेसला बाजून ठेवून विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न आहे का? अशा चर्चांना सुरुवात झाली. त्यात शरद पवारांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत भूषण यांची दोनदा भेट घेतली होती. त्यामुळे तर या चर्चांना अधिक उधाण आले होते. पण, 'राष्ट्रमंचची बैठक राजकीय स्वरूपाची नव्हती. ही बैठक भाजपविरोधात अन्य राजकीय पक्षांची आघाडी करण्याचा तसेच काँग्रेसला एकाकी पाडण्याचा प्रयत्न मानणेही चूक ठरेल', असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार माजीद मेमन यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या आघाडीची शक्यता तूर्त तरी थंडावली आहे, पण शरद पवारांच्या निवासस्थानी झालेली बैठक महत्वपूर्ण असल्याचं म्हणता येईल (significance of Rashtra Manch called the meeting at Sharad Pawar home )

शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीचे महत्व काय?

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस प्रणित यूपीएचा एक भाग आहे. शिवाय महाराष्ट्रात एनसीपी शिवसेना आणि काँग्रेससोबत सत्तेत आहे. असे असताना महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र आहे. काँग्रेस नेते स्वबळाचा नारा देत आहेत. दुसरीकडे, २०२४ च्या निवडणुकीत भाजपसमोर आव्हान उपस्थित करणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शरद पवार यांच्या निवास्थानी झालेली 'राष्ट्रमंच'ची बैठक काँग्रेस आणि भाजप या दोघांसाठी इशारा होता. २०१८ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रमंचच्या याआधी अधूनमधून बैठका व्हायच्या. पण, राष्ट्रमंचला पुन्हा सक्रिय करण्यात आलं आहे. राष्ट्रमंचचा एक ढाल म्हणून वापर करायचा, जेणेकरुन नवी योजना अंमलात आली नाही तर त्याचं खापर कुणावर फुटणार नाही.

काँग्रेसकडे नेतृत्वाचा अभाव असल्याची टीका अनेक नेते करत आहेत. भाजपसमोर कडवं आव्हान उभं करायचं असेल तर विरोधकांकडे एक भक्कम नेता असणे आवश्यक आहे. त्यामुळे काँग्रेसने एखादा पर्याय घेऊन समोर यावं किंवा यूपीएमधील कोणाला नेतृत्व करु द्यावं, यासाठी राष्ट्रमंचचा घाट असल्याचं सांगितलं जातंय. काँग्रेसच्या पुढाकाराची वाट न पाहता भाजपविरोधक एकत्र येऊ पाहात आहेत. काँग्रेस यामध्ये इच्छेनुसार सहभागी होऊ शकते. पण, काँग्रेससारख्या संपूर्ण भारतात अस्तित्व असणाऱ्या पक्षाला सोबत न घेता भाजपविरोधी आघाडी तयार करणे फायद्याचे नसल्याचे डाव्या पक्षांना वाटते.

rashta munch
राष्ट्रमंंच : शरद पवार यांच्या निवासस्थानी काय झाली चर्चा?

राष्ट्रमंचच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका महत्वाची आहे. शरद पवार एक वरिष्ठ राजकीय नेते असून जवळपास सर्वच पक्षांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. शरद पवारांचा अनुभव आणि आवाका पाहता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय ठरु शकतात. असे असले तरी वय शरद पवारांच्या बाजूने नाही, ते सध्या ८० वर्षांचे आहेत. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांचे वय ८३ झालेले असेल. तरीही, काही नेत्यांना वाटतं की भाजप-विरोधी आघाडी निर्माण करण्यात शरद पवार महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात.

rashta munch
'कोवॅक्सिन'ला WHO मंजुरी देणार?; भारत बायोटेकची महत्त्वपूर्ण बैठक

प्रशांत किशोर यांची भूमिका काय?

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या दणदणीत विजयाने प्रशांत किशोर यांचे महत्व वाढले आहे. शिवाय त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली असणार आहे. प्रशांत किशोर यांनी देशातील अनेक राजकीय पक्षांचे निवडणूक कॅम्पेन चालवले आहेत. किशोर यांनी गेल्या आठवड्यात दोनवेळा शरद पवारांची भेट घेतली होती. त्यांच्यात काय चर्चा झाली हे स्पष्ट नाही, पण या भेटीनंतरच शरद पवारांनी राष्ट्रमंचची बैठक बोलावली होती. सध्यातरी प्रशांत किशोर यांनी स्वत:ला राष्ट्रमंचच्या बैठकीपासून आणि तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीपासून दूर ठेवले आहे. पण, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत, हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com