काश्‍मिरातील परिस्थिती अगदी वेगळी - येचुरी 

पीटीआय
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

 सरकार सांगत असलेल्या स्थितीपेक्षा काश्‍मीर खोऱ्यातील स्थिती अगदी विरुद्ध असल्याची माहिती मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी आज दिली. यासंदर्भातील अहवाल मी सर्वोच्च न्यायालयाला देईन, असे ते म्हणाले. 

नवी दिल्ली - सरकार सांगत असलेल्या स्थितीपेक्षा काश्‍मीर खोऱ्यातील स्थिती अगदी विरुद्ध असल्याची माहिती मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी आज दिली. यासंदर्भातील अहवाल मी सर्वोच्च न्यायालयाला देईन, असे ते म्हणाले. 

"मी तारिगामी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांच्या प्रकृतीबाबत आणि जे काही पाहिले त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र मी न्यायालयाला सादर करेन,' असे सांगतानाच, सरकार सांगते त्यापेक्षा स्थिती वेगळी असल्याचे विमानतळ ते तारिगामी यांच्या घरापर्यंतच्या प्रवासात आढळले, असे त्यांनी नमूद केले. श्रीनगर विमानतळार उतरल्यावर मी त्याचदिवशी परत जावे, असे अधिकाऱ्यांनी सुचविले होते; पण सहकाऱ्याच्या प्रकृतीची चौकशी करून दुसऱ्या दिवशीच मी जाऊ शकेन, असे मी त्यांना पटवून दिले. मी तारिगामी यांना गुरुवारी आणि शुक्रवारी भेटलो. मला कोणालाही भेटू दिले गेले नाही. माझा रात्रीचा मुक्काम सरकारी विश्रामगृहात होता आणि मला बाहेर पडता आले नाही. माझ्याभोवती सतत सुरक्षा जवान होते, असेही येचुरींनी सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे येचुरी दोन दिवस श्रीनगरमध्ये होते. मात्र, त्यांनी कोणत्याही राजकीय हालचाली करू नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाने बजावले होते. माकपच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य आणि चार वेळा आमदार असलेले तारिगामी पाच ऑगस्टपासून नजरकैदेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The situation in Kashmir is very different says Sitaram Yechury