आर्य समाजाचे नेते स्वामी अग्निवेश यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

सामाजिक कार्यकर्ते आणि आर्य समाजाचे नेते स्वामी अग्निवेश यांनी शुक्रवारी सांयकाळी सातच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. 

नवी दिल्ली - सामाजिक कार्यकर्ते आणि आर्य समाजाचे नेते स्वामी अग्निवेश यांनी शुक्रवारी सांयकाळी सहाच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांना प्रकृती बिघडल्यानं दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अग्निवेश हे ८० वर्षाचे होते. त्यांना यकृतासंबधी आजार होता. स्वामी अग्निवेश यांना दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बायिलरी सायन्समध्ये दाखल केलं होतं. शिवाय त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांना मंगळवारपासून ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी त्यांची प्रकृती अधिक बिघड गेली. सांयकाळी सहाच्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

स्वामी अग्निवेश हे सामाजिक मुद्द्यांवर परखड भाष्य करत. त्यांनी 1970 मध्ये आर्यसभा नावाचा पक्षही स्थापन केला होता. 1977 मध्ये हरियाणा विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले आणि शिक्षण मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं. 1981 मध्ये त्यांनी बंधुआ मुक्ती मोर्चा नावाच्या संघटनेची स्थापना केली. 

स्वामी अग्निवेश 2011 मध्ये अन्ना हजारे यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातही सहभागी झाले होते. मात्र नंतर मतभेद झाल्यानं आंदोलनातून बाजूला झाले होते. एवढंच नाही तर त्यांनी रियालिटी शो बिग बॉसमध्येही भाग घेतला होता. तीन दिवस ते बिग बॉसच्या घरात होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social activist Swami Agnivesh passes away