हिंदू धर्माला संघटित करायचे तर सामाजिक समता ही अनिवार्य - मोहन भागवत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohan Bhagwat
हिंदू धर्माला संघटित करायचे तर सामाजिक समता ही अनिवार्य - मोहन भागवत

हिंदू धर्माला संघटित करायचे तर सामाजिक समता ही अनिवार्य - मोहन भागवत

नवी दिल्ली - हिंदू धर्माला (Hindu Religion) संघटित करायचे तर सामाजिक समता (Social Equality) ही अनिवार्य आहे असे बजावतानाच, धर्माच्या उन्नती बरोबरच भारताच्या उन्नतीची प्रक्रियाही सुरू झाली असून नजीकच्या काळात ती 'पूर्णतेचा किंवा पूर्ततेच्या' मार्गावर जाईल असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) यांनी केले.

करोल बाग भागातील श्रीजयकृष्णी प्रतिनिधि सभा पंजाब या संस्थेचा शताब्दी महोत्सवानिमित्त उभारण्यात येणाऱ्या श्रीकृष्ण मंदिराच्या भूमिपूजनप्रसंगी भागवत बोलत होते. महानुभाव पंथाचे अनेक साधु संत उपस्थित होते.

भागवत यांचे अखंड भारताचे विधान सध्या चर्चेचा विषय ठरले असताना त्यांनी सामाजिक समतेच्या धोरणाचा पुरस्कार केल्याने नवी चर्चा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. भारताची उन्नती समदृष्टीच्या धोरणाने होईल असे सांगून भागवत म्हणाले की सामाजिक समता आणि हिंदू समाजाचे संघटन हे समानार्थी शब्द आहेत, असे संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे म्हणणे होते.आजही ते कालसुसंगत ठरते.

कोणताही समाज किंवा देश यांची उन्नती किंवा विकास हा शांततेच्या मार्गानेच होत असतो. जगा आणि जगू द्या यालाच अहिंसा असेही म्हणतात.सत्य, करुणा, पवित्रता व तपस्चर्या हे भारतासारख्या धर्मपरायण देशाचे चार स्तंभ आहेत. आजच्या शब्दावलीत याला जोडूनच सत्य अहिंसा शांती आणि समता यांचे आचरण आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य सामाजिक विषमता समाप्त करणे हेच होते. आमच्या डोळ्यात जर विषमतेचे विष चढले असेल तर ते वेळीच उतरविले पाहिजे. 'आपल्याला जी समदृष्टी मिळाली ती संपूर्ण समाजात प्रतिबिंबित करण्याचा' विडा चक्रधरां सारख्या संतांनी उचलला होता, असेही भागवत यांनी सांगितले.

Web Title: Social Equality Is Essential If Hindu Religion Organized Mohan Bhagwat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mohan Bhagwatreligion