भारताच्या लाडक्या मालवाहू टेम्पो 407 बद्दलच्या काही खास गोष्टी

भारताच्या लाडक्या मालवाहू टेम्पो 407 बद्दलच्या काही खास गोष्टी

भारतातील आघाडीच्या वाहन कंपन्यांपैकी एक असणाऱ्या टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो मालवाहतुकीसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वाहनांपैकी एक. गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून टाटाचा हा टेम्पो भारतातील रस्त्यांवर सामानाची ने-आण करण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे ३३ वर्षांनंतरही प्रतिस्पर्धी कंपन्या वाढूनही त्याची मागणी अजिबात घटलेली नाही.

भारतात ८० च्या दशकात बऱ्यापैकी नवनवीन प्रकारच्या गाड्या रस्त्यांवर धावताना दिसत होत्या. एकीकडे पद्मिनी, ॲम्बेसिडर यासारख्या कार; तर राजदूतसारख्या मोटरसायकल भारतीय बाजारात होत्या. यासोबतच माल वाहून नेण्यासाठी अवजड वाहन म्हणून अशोक लेलॅंड कंपनीचे ट्रक बाजारात येत होते. असे असतानाही कमी प्रमाणातील माल वाहून नेण्यासाठी कमी आकाराच्या गाडीची गरज होती.

लोकांची ही गरज नजरेसमोर ठेवत टाटा कंपनीने ४०७ टेम्पो तयार केला. हलके व्यावसायिक वाहन म्हणून टाटाने १९८६ मध्ये या टेम्पोची निर्मिती केली. तब्बल सव्वादोन टन वजनाचा माल वाहून नेऊ शकणाऱ्या या टेम्पोची लांबी ४.७ मीटर; तर वजन ६ हजार किलोच्या जवळपास आहे. दरम्यान, या विशेष हलक्‍या मालवाहू टेम्पोची कल्पना मूळची जर्मनीमधील हनोमॅग कंपनी तयार करत असणाऱ्या हनोमॅग एफ सीरिजच्या टेम्पोतून घेण्यात आली आहे.   

४०७ टेम्पो हा काळानुसार वेगवेगळ्या रूपात ग्राहकांसमोर येऊ लागला आहे. सुरुवातीला ट्रकचे काम करणारा ४०७ नंतर पिक-अप, टॅंकर अशा वेगवेगळ्या व्यावसायिक वाहनांचे काम बजावू लागला. यानंतर २००६ मध्ये ब्राझीलच्या मार्कोपोलो कंपनीसोबत करारानंतर टाटाने ४०७ च्याच बनावटीवर स्टारबस तयार केली. १२ आणि २४ आसनक्षमता असणाऱ्या या बसमध्ये ४०७ टेम्पोचेच अनेक पार्टस बसविण्यात आले आहेत.

सुरुवातीला केवळ भारतात विक्री होत असणाऱ्या ४०७ ने आपल्या सेवेने जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर भारतासह आशिया आणि दक्षिण आफ्रिकेतील १५ देशांतील रस्त्यांवर ४०७ धावू लागले. अमेरिका आणि युरोपमध्येदेखील ४०७ ची विक्री वाढविण्याच्या दृष्टिने टाटा कंपनी प्रयत्न करत आहे. गेली ३३ वर्षे भारतात सर्व प्रकारच्या सामानाची ने-आण करणाऱ्या ४०७ ला सध्या भारतासह अनेक देशातील वाहन बाजारात असणारी मागणी लक्षणीय आहे.

वैशिष्ट्ये

  • ज्या वेळी टाटाने ४०७ बाजारात आणला तेव्हा मिस्तुबिशी कंपनीचा आयशर, टोयोटाचा डीसीएम, निसान कंपनीचा ॲलविनसारखी मालवाहू वाहने बाजारात होती. या सर्वांच्या तुलनेत ४०७ ची किंमत कमी होती. कंपनीतर्फे ३ लाख कि.मी. पर्यंतची वॉरंटीदेखील देण्यात येत होती. 
  •  व्यावसायिक वाहनांच्या प्रकारात सर्वाधिक विक्री होणारे वाहन म्हणजे ४०७ टेम्पोच्या ५ लाखांहून अधिक मॉडेल्सची विक्री झाली आहे.
  •  महिन्याला १ हजार मॉडेल्सची विक्री होणारा ४०७ टेम्पो हे सर्वात जलदगतीने विक्री होणारे व्यावसायिक वाहन आहे.   
  •  एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार ४०७ हा टेम्पो चालविणाऱ्यापैकी ५५ टक्के लोकांचे हे सर्वात पहिले व्यावसायिक वाहन आहे.
  •  कंपनीने २००९ मध्ये टेम्पोमध्ये सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) इंधनदेखील वापरण्याची सोय करून दिल्याने ४०७ टेम्पो हा ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय झाला. 
  •  अधिक माल बसणाऱ्या ४०७ ला वळविण्यासाठी कमी जागा लागत असल्याने नवख्या चालकांकडून याचा वापर अधिक प्रमाणात होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com