आईसाठी योग्य जोडीदार पाहिजे, पण...

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

एका युवकाने फेसुबकवर आपल्या आईसाठी योग्य जोडीदार हवा आहे, याबरोबरच जोडीदार कसा हवा याविषयी एक अटही घातली आहे. संबंधित पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हुगली (पश्चिम बंगाल): एका युवकाने फेसुबकवर आपल्या आईसाठी योग्य जोडीदार हवा आहे, याबरोबरच जोडीदार कसा हवा याविषयी एक अटही घातली आहे. संबंधित पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वीच एका युवतीने आपल्या आईसाठी जोडीदार हवा, अशी पोस्ट फेसबुकवरून शेअर केली होती. यानंतर युवकाने आईसाठी योग्य जोडीदार निवडण्यासाठी फेसबुकचा पर्याय निवडला आहे. संबंधित पोस्ट व छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. काही जणांनी टीका केली आहे तर काहींनी त्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

गौरव अधिकारी असे युवकाचे नाव असून, त्याने आपल्या 45 वर्षीय आईसाठी योग्य जोडीदार निवडताना एक अट ठेवली आहे. फेसबुकवर गौरवने म्हटले आहे की, 'फेसबुक पोस्ट लिहिण्याआधी मी आईसोबत चर्चा केली. आई फक्त माझाच विचार करत असल्याचे मला समजले. मग मी सुद्धा आईचा विचार करायलाच हवा. मी कामानिमित्त अनेकदा घराबाहेर असते. त्यामुळे आई घरी एकटीच असते. त्यामुळे तिचे सगळे दिवस तिने छान आनंदात आणि सुखात घालवावेत अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी माझ्या आईसाठी एक चांगला साथीदार शोधत आहे. आम्हाला पैसे, संपत्ती, जमीन यापैकी कशाचाच मोह नाही. फक्त, जो कोणी वर म्हणून येणार असेल त्याने स्वयंपूर्ण असायला हवे. माझ्या आईची त्याने फुलांसारखी काळजी घ्यायला हवी. तिच्यावर प्रेम करायला हवे. आईचा आनंद हाच माझा आनंद आहे. पोस्टवर जे लोक हसतील त्यांच्यामुळे मी माझा निर्णय बदलणार नाही. ज्याला ही अट मान्य असेल त्याने संपर्क करावा.'

दरम्यान, हुगली जिल्ह्यातील फ्रेंच कॉलनीमध्ये गौरव आईसोबत राहतो. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. गौरव हे त्यांच्या आई-वडिलांचे एकुलतेएक सुपूत्र आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: son is looking groom for mother in west bengal facebook post viral