"भिंतीवरून फेकले, माझा जीव गेला असता" ; लडाखसाठी लढणाऱ्या 'रँचो'चा गौप्यस्फोट! - Sonam Wangchuk | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonam Wangchuk

Sonam Wangchuk : "भिंतीवरून फेकले, माझा जीव गेला असता" ; लडाखसाठी लढणाऱ्या 'रँचो'चा गौप्यस्फोट!

Sonam Wangchuk : लडाखचे शिक्षण सुधारक आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक हे उपोषणावर बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. सोनम वांगचुक १८ हजार फूट उंचीवर असलेल्या खादुर्ंगला येथे उपोषण करत आहेत. त्याठीकाणी सध्या तापमान मायनस २० डिग्री सेल्सिअस आहे. कडाक्याच्या थंडीत वांगचुक लडाखसाठी लढा देत आहेत.

दरम्यान सोनम वांगचुक यांनी धक्कादायक खुलासा केला. लडाख प्रशासनाने सोनम वांगचुक यांच्या हालचालींवर निर्बंध घातले आहेत. यासोबतच त्यांना नजरकैदेतही ठेवण्यात आले आहे. खुद्द थ्री इडियट्सच्या खऱ्याखुऱ्या रँचोने ही माहिती दिली आहे. 

केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखला भारतीय संविधानाच्या सहाव्या अनुसूचित सहभागी करण्याची मागणी सोनम वांगचुक यांनी केली आहे. या मागणीसाठी ते पाच दिवसांच्या उपोषणावर बसले आहेत. वांगचुक यांनी यापूर्वी पंतप्रधान मोदींना आवाहन केलं होतं की, लडाखला वाचवा. कारण एका अभ्यासात असं म्हटलंय की, इथले सुमारे दोन तृतीयांश ग्लेशिअर संपण्याच्या मार्गावर आहे. यामुळं लडाखमधील मुळ जमाती, उद्योग नष्ट होणार आहेत.

दरम्यान सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत धक्कादायक खुलासा केला आहे. सोनम वांगचुक म्हणाले, तापमान मायनस २० डिग्री सेल्सिअसमध्ये माझ्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. जोरदार बर्फवृष्टीमुळे खारदुंगला पास ब्लॉक झाला होता. प्रशासनाने माझ्या उपोषणावर मर्यादा आखल्या आहेत. मात्र मला वाटते की खारदुंगला तळावर सर्व मूलभूत सुरक्षा आणि आरोग्य सुविधा आहेत आणि मला या ठीकाणी उपोषणास बसण्याची  परवानगी दिली पाहिजे. 

पोलिसांनी त्रास दिल्याचा आरोप देखील सोनम वांगचुक यांनी केला आहे. वांगचुक म्हणाले, "२६ जानेवारीला सकाळी काही पोलीस आले. मी जाऊन पोलिसांना विचारले असता त्यांनी सांगितले की तुम्ही इतके मोठे व्यक्तिमत्व आहात त्यामुळे तुम्हाला सुरक्षित ठेवायचे आहे. तुमच्यावर निर्बंध घालण्याचा आमचा हेतू नाही."

"पोलीस म्हणाले, लेहमध्ये धर्माचे मोठे मंदिर आहे. तिथेही उपोषण सुरू आहे. तुमच्या आगमनाची लोकांना अपेक्षा आहे, आम्ही तिथूनच आलो आहोत. त्यामुळे मी मंदिरात गेलो. लोकांसोबत पूजेला बसलो. पूजा आटोपून लोक निघून गेल्यावर ६-७ पोलीस आले आणि म्हणाले तुम्ही इथे कसे आलात? त्यांनी मला धक्काबुक्की केली. परिसरातील गेट बंद होते तर त्यांनी मला  भिंतीवरून फेकले. २६ जानेवारीच्या दिवशी पोलिसांनी दबावाखाली माझ्या सुरक्षेच्या नावाखाली माझ्यासोबत हे कृत्य केले. यामध्ये माझा जीव देखील जाऊ शकला असता," असा आरोप सोनम वांगचुक यांनी केला आहे.

टॅग्स :LadakhLeh Ladakh