केंद्राविरुद्ध सोनिया गांधी झाल्या आक्रमक

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 19 October 2020

देशातील सध्याच्या वातावरणात काँग्रेसची राजकीय रणनिती ठरवण्यासाठी आजची बैठक महत्त्वाची होती. कार्यकारिणीतील वरिष्ठ सदस्यांसोबतच सरचिटणीस आणि सर्व राज्यांचे प्रभारी देखील यामध्ये सहभागी झाले होते.

नवी दिल्ली - कोरोना संक्रमण, आर्थिक मरगळ, शेतकरी आंदोलन तसेच बिहार विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज पक्षाचे सरचिटणीस आणि राज्य प्रभारींची बैठक घेऊन जनहिताच्या मुद्द्यांवर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचे आदेश दिले. लोकशाहीची सध्या बिकट अवस्था असून देशभरात अराजकतेचे वातावरण आहे, अशा शब्दात सोनियांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशातील सध्याच्या वातावरणात काँग्रेसची राजकीय रणनिती ठरवण्यासाठी आजची बैठक महत्त्वाची होती. कार्यकारिणीतील वरिष्ठ सदस्यांसोबतच सरचिटणीस आणि सर्व राज्यांचे प्रभारी देखील यामध्ये सहभागी झाले होते. दुपारी चारच्या सुमारास सुरू झालेली बैठक उशिरापर्यंत चालली. पक्षाचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटद्वारे बैठकीची माहिती दिली.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बिहार विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. सोबतच मध्य प्रदेशात राज्यसरकारचे भवितव्य ठरविणाऱ्या विधानसभेच्या 28 जागांसाठी पोटनिवडणूकही होत आहे. त्याचप्रमाणे कृषी सुधारणा कायद्यांवरून शेतकऱ्यांमध्ये असलेले नाराजीचे वातावरण, उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधींच्या आक्रमकतेला मिळालेला प्रतिसाद या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी पक्षाच्या नेत्यांना जनतेमध्ये मिसळून जनहिताच्या मुद्द्यांवर संघर्ष करण्यास सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हाथरसमधील बलात्काराच्या घटनेचा निषेध करताना उत्तर प्रदेशातील कायदा सु्व्यवस्थेवर सोनियांनी जोरदार टिकास्त्र सोडले. देशात कशाप्रकारचे वातावरण आहे हे सर्वांनाच माहिती आहे. राज्य सरकारे प्रशासन चालविण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहेत. लोकांना रोजगार नाही, परिणामी गुन्हेगारीचे प्रमाण वाढते आहे. कायद्याचा धाक उरलेला नसून गुन्हेगार मोकाट सुटले आहेत,  अशा शब्दात सोनिया गांधींनी राज्य सरकारवर प्रहार केला. 

''बेटी बचाओ ते गुन्हेगार बचाओ''
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधींनी उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवरून भाजपला चिमटा काढला आहे. राज्यातील लखीमपूर खिरी येथे तरुणीची छेड काढणाऱ्या आरोपीला भाजप नेत्याने सोडविल्याची बातमी टॅग करून राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करणारे ट्विट केले. बेटी बचाओ ने सुरवात झाली. आता मात्र गुन्हेगार बचाओ सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonia Gandhi aggressive against the Center government