सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेला रवाना; राहुल गांधीसुद्धा सोबत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

किमान दोन आठवड्यांसाठी सोनिया गांधी परदेशात असतील. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधी असणार आहेत. 

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशानाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी भाग घेणार नसल्याची माहिती समोर येत आहे. सोनिया गांधी त्यांच्या नियमित तपासणीसाठी अमेरिकेत जाणार आहेत. किमान दोन आठवड्यांसाठी सोनिया गांधी परदेशात असतील. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधी असणार आहेत. सोनिया यांच्यासोबत राहुल गांधी जरी जाणार असले तरी काही दिवसांतच ते परत येण्याची शक्यता आहे. त्यावेळी प्रियांका गांधी सोनिया गांधी यांच्यासोबत थांबतील अशीही माहिती मिळत आहे.

सोनिया गांधी यांनी त्यांच्या संसदीय रणनिती गटाशी चर्चा केली आहे. दोन्ही सदनांमध्ये चांगला समन्वय असावा यासाठी स्पष्ट आदेश दिले आहेत. काँग्रेस अध्यक्षांनी देशावर परिणाम कऱणाऱ्या प्रमुख मुद्द्यांवर संसदेत चर्चा करा असे सांगितले आहे. 

काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी परदेशात गेल्याचं सांगितलं आहे. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ते परदेशात गेले आहेत. कोरोनामुळे आधीच यामध्ये उशिर झाला असल्याची माहितीही त्यांनी दिली. सोनिया गांधी यांच्यासोबत राहुल गांधी असतील असंही सुरजेवाला यांनी स्पष्ट केलं. 

केंद्र सरकारला सध्याच्या आर्थिक मंदीवरून आणि कोरोनाला रोखण्यात अपय़श आल्याच्या मुद्द्यांवरून काँग्रेस घेरण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी परदेशात जाण्याच्या एक दिवस आधी पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले. त्यामध्ये लेटरबॉम्ब टाकणाऱ्या गुलाम नबी आझाद यांना महासचिव पदावरून हटवण्यात आलं आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonia Gandhi has gone abroad for a routine check up with rahul says congress