esakal | सोनिया गांधीच तुर्तास काँग्रेसच्या अध्यक्षपदी; जाणून घ्या १० मुद्दे
sakal

बोलून बातमी शोधा

rahul_20gandhi_20and_20sonia_20gandhi.jpg

काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्व बदलाची मागणी केल्याने मोठे घमासान सुरु झाले आहे.

सोनिया गांधीच तुर्तास काँग्रेसच्या अध्यक्षपदी; जाणून घ्या १० मुद्दे

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्व बदलाची मागणी केल्याने मोठे घमासान सुरु झाले आहे. काँग्रेस नेत्यांनी सक्रीय आणि पूर्णवेळ काम करणारा अध्यक्ष निवडण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे सोनिया गांधी यांनी पद सोडण्याची तयारी दाखवली आहे. तसेच अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार निवडण्यासही सांगितलं आहे. नवा अध्यक्ष निवडला जाईपर्यंत सोनिया गांधीच हंगामी अध्यक्ष राहणार असल्याचं कळत आहेत.

राहुल गांधींवर आरोप करणारे ट्विट घेतले मागे; कपिल सिब्बल यांचा खुलासा

काँग्रेसच्या २० पेक्षा अधिक वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं आहे. कपिल सिब्बल, शशी थरुर, गुलाम नबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण, विवेद टांका, आनंद शर्मा यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहित तात्काळ नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये पेपर बॉम्ब फुटला आहे. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली होती.

राहुल गांधी यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. त्यांनी पत्र लिहिण्याच्या टाईमिंगवर शंका घेतली होती. सोनिया गांधी आजारी आहेत. शिवाय पक्ष संकटात असताना नेत्यांनी पत्र लिहिलं आहे. त्यामुळे यामागे भाजपचा हात असल्याचं राहुल गांधी म्हणाले होते. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता.

वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर तात्काळ ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. राहुल गांधीनीही यांनी दखल घेत सिब्बल यांना स्वत: संपर्क केला. राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर सिब्बल यांनी आपलं ट्विट मागे घेतलं आहे.

४५ वर्षांच्या गुलामीचं हेच फळ का? ओवैसींचा गुलाम नबी आझादांवर निशाणा

काँग्रेस नेते गुलाब नवी आझाद यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली होती. भाजपशी लागेबांधे असल्याचे पुरावे मिळाले तर मी राजीनाम देईन, अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी घुमजाव केला आहे. माझं वक्तव्य वेगळ्या संदर्भात बोललं गेल्याचं ते म्हणाले आहेत. शिवाय राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासोबत कोणतेही मतभेद नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसने राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. राहुल गांधी यांनी 'काँग्रेस नेत्यांच्या मागे भाजपचा हात आहे', असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. विनाकारण चुकीच्या बातम्या माध्यमात पसरवण्यात आल्या, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

काँग्रेस नेत्यांमध्ये दोन गट पडले आहेत. एक गट पत्र लिहिणाऱ्यांच्या बाजूने आहे, तर दुसरा गट पत्र लिहिणाऱ्यांच्या विरोधात. हरिणाया काँग्रेसच्या नेत्या कुमारी शैलजा यांनी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवर टीका केली आहे. जे लोक पक्षनेतृत्वात बदल मागत आहेत, ते भाजपसोबत मिळालेले आहेत, असं त्या म्हणाल्या आहेत. काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांनीही पत्र लिहिणाऱ्यांवर टीका केली असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

पत्र लिहिणाऱ्यांपैकी काहींनी बैठकीनंतर सोनिया गांधी यांची भेट घेवून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजारी असलेल्या सोनिया यांनी कुणालाही भेटण्याचे टाळले.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोनिया यांचे समर्थन केले आहे. शिवाय त्यांनीच अध्यक्षीपदी असावे, अशी विनंती केली आहे. मात्र, सोनिया गांधी आपल्या पद सोडण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे पक्षासाठी नवीन अध्यक्ष शोधण्याचे काम सुरु झाले आहे.

राहुल गांधी यांनीच पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावं अशी मागणी पक्षातून होत आहे. राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी सर्व कार्यकर्त्यांना राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत अशी इच्छा असल्याचं म्हटलं होतं. मात्र, राहुल गांधी यांनी आजच्या बैठकीत पुन्हा अध्यक्ष होण्याची कोणतीही तयारी दाखवली नाही. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस घराण्याबाहेरील अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. 

(edited by-kartik pujari)