
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतले सोनिया, प्रियांका स्टार प्रचारक
नवी दिल्ली : काँग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ३० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासोबतच असंतुष्ट जी-२३ गटाचे नेते गुलाम नबी आझाद, हरयानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांनाही पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच, महाराष्ट्रातील मंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या व आमदार प्रणिती शिंदे यांचा देखील स्टार प्रचारकांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा: Bank Fraud : ED ची मोठी कारवाई; जप्त केली 26.59 कोटींची रोकड, दागिने
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी १० फेब्रुवारीला मतदान होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काँग्रेसने आतापर्यंत १६६ उमेदवारांची घोषणा केली असून रोजगारकेंद्रीत जाहीरनामा देखील प्रकाशित केला आहे. आज पहिल्या टप्प्यासाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या नावांची घोषणा केली. यात गांधी कुटुंबीयांसोबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उत्तर प्रदेशची विशेष जबाबदारी सांभाळणारे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, जी-२३ गटाचे नेते मानले जाणारे माजी मंत्री गुलाम नबी आझाद, हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा: Young weather champion : प्राजक्ता कोळी साधणार तरुणांशी संवाद
हार्दिक पटेल, कन्हैयाकुमार
गुजरातचे प्रदेशाध्यक्ष हार्दिक पटेल, कन्हैयाकुमार, सचिन पायलट, उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू, सलमान खुर्शीद, राज बब्बर, प्रमोद तिवारी, पी. एल. पुनिया, आरपीएन सिंह, प्रदीप जैन आदित्य यांनाही स्टार प्रचारक बनविण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील दोन महिला नेत्यांचा समावेश
स्टार प्रचारकांमध्ये महाराष्ट्रातील मंत्री वर्षा गायकवाड आणि आमदार प्रणिती शिंदे या दोन नेत्यांनाही स्थान देण्यात आले आहे. वर्षा गायकवाड या उत्तर प्रदेशातील उमेदवारी अर्ज छाननी समितीच्याही सदस्य राहिल्या आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने कोरोनाच्या वाढत्या थैमानामुळे प्रचार सभा, रोड शो यासारख्या लोकांशी थेट संपर्काच्या प्रचारावर जानेवारी अखेरपर्यंत घातली आहे. केवळ बंदिस्त सभागृहांमध्ये सुरक्षित अंतर राखून ५० टक्के आसनक्षमता भरण्यास अथवा ३०० लोकांच्या उपस्थितीलाच परवानगी दिली आहे. तसेच उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची परवानगी असून त्यासाठी सोबत १० लोकांनाच नेण्याचेही बंधन घातले आहे.
Web Title: Sonia Priyanka Star Campaigner Uttar Pradesh Assembly Elections
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..