Tamil Nadu Rain : दक्षिण तमिळनाडू अतिवृष्टीमुळे जलमय

दक्षिण तमिळनाडूची अतिवृष्टीमुळे अक्षरश: दाणादाण उडाली. प्रचंड पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली तसेच रस्ते, पुलासह रहिवासी इमारतीही पाण्यात बुडाल्या.
Tamil Nadu Rain
Tamil Nadu RainSakal
Updated on

चेन्नई/कन्याकुमारी - दक्षिण तमिळनाडूची अतिवृष्टीमुळे अक्षरश: दाणादाण उडाली. प्रचंड पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली तसेच रस्ते, पुलासह रहिवासी इमारतीही पाण्यात बुडाल्या. राज्यातील कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थूथुकुडी आणि तेनकासी या जिल्ह्यांत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन कोलमडून पडले आहे.

लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदतही घेतली आहे, अशी माहिती तमिळनाडूचे मुख्य सचिव शिवदास मीना यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ते म्हणाले, की पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी ८४ नौका तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, दक्षिण तमिळनाडूतील थूथुकुडीसह नजीकच्या श्रीवैकुंदम व कयालपट्टिणम या शहरांत मदतकार्यासाठी अतिरिक्त नौका जमविण्यात आल्या आहेत. सखल भागांतील सुमारे साडेसात हजार नागरिकांची सुटका करण्यात आली असून त्यांना ८४ मदत छावण्यांत ठेवण्यात आले आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि अग्निशमन दल तसेच पोलिसांच्या पथकांनी पावसामुळे जलमय झालेल्या भागातील इमारती, शाळांमधून नागरिकांची सुटका केली. सामान्य इशारा यंत्रणेच्या माध्यमातून सुमारे ६२ लाख नागरिकांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाल्याने राज्य सरकारने दक्षिण तमिळनाडूतील चार जिल्ह्यांना सोमवारी (ता.१८) सुटी जाहीर केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवरही परिणाम झाला. लोहमार्ग पाण्यात बुडाल्याने तिरूनेलवेली ते तिरूचेंदूर विभागांदरम्यानची रेल्वेसेवा विस्कळित झाली. दक्षिण तमिळनाडूमधील अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या. त्याचप्रमाणे, काही अंशत: रद्द करण्यात आल्या तर काही रेल्वेंचे मार्ग बदलण्यात आले.

पावसामुळे ओट्टापिडरमजवळील मदुराईला जाणारा लिंक रस्ता पूर्णपणे वाहून गेला. कन्याकुमारी जिल्ह्यातील ओझुगिनचेरीजवळ पझायारू नदीला मोठ पूर आल्याने नजीकच्या भातशेतीत सुमारे चार फुटांपर्यत पाणी साचले. त्याचप्रमाणे, नागरकोयलमधील मीनाक्षी गार्डन आणि रेल्वे कॉलनी या भागांतील रहिवासी इमारतीही जलमय झाल्या.

स्टॅलिन यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

तमिळनाडूतील पूरस्थितीमुळे राज्याचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. तमिळनाडूत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांनी लक्ष घालून चर्चा करावी. चक्रीवादळामुळे अतिवृष्टीचा फटका बसलेल्या चेन्नईसह दक्षिण तमिळनाडूतील कन्याकुमारी, थुथूकुंडी, तिरूनेलवेली आणि टेंकासी या चार जिल्ह्यांना केंद्राने तातडीने निधी द्यावा, अशी मागणीही मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी या पत्रात केली आहे.

पावसाने हाहाकार

  • नागरकोईलमधील घरे पाण्याखाली

  • स्थानिकांच्या मदतीने दोर वापरत बचाव पथकांकडून अडकलेल्या नागरिकांची सुटका

  • श्रीवाईकुंडमला लोहमार्गाचा भराव वाहून गेला

  • पुरात रस्ते बुडाल्याने काही गावांचा संपर्क तुटला

  • सार्वजनिक वाहतूक सेवेवरही विपरीत परिणाम

  • संततधार पावसामुळे तिरूनेलवेली जिल्ह्यातील मणिमुथर धबधबा ओसंडून वाहू लागला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com