'लोग आते गए और कारवां बनता गया'; राहुल गांधींसाठी काँग्रेसच्या बड्या नेत्याची खास पोस्ट I Rahul Gandhi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra Satej Patil

राहुल गांधींना हिणवण्यासाठी गेली कित्येक वर्षे चालू असलेलं एक मोठ्ठं प्रोपगांडा इंजिन असो किंवा काँग्रेस पक्षच अस्तित्वात नाही असं म्हणणारे असो... या सगळ्यांना 'भारत जोडो'ला मिळालेल्या उस्फूर्त प्रतिसादानं चोख उत्तर दिलंय.

Rahul Gandhi : 'लोग आते गए और कारवां बनता गया'; राहुल गांधींसाठी काँग्रेसच्या बड्या नेत्याची खास पोस्ट

Bharat Jodo Yatra : कन्याकुमारीतून सुरु झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा वादळी बर्फवृष्टी दरम्यान सोमवारी (Bharat Jodo Yatra) समारोप झाला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बर्फवृष्टी होत असताना कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनीही ट्विटव्दारे आपली भावना व्यक्त केलीये. गेल्या दीडशे दिवसांत भारतानं एक झंझावात बघितला, तो म्हणजे राहुल गांधी या नावाचा! कन्याकुमारीपासून श्रीनगरपर्यंत एक माणूस उन्ह, वारा, पाऊस झेलत सतत चालत राहतो आणि कशा पद्धतीनं देशाची अखंडता घट्ट करतो, हा याची देही याची डोळा अनुभव आजच्या पिढीनं घेतला. ज्या-ज्या वेळी गांधी चालू लागतात, त्या त्या वेळी देश बदलतो, हा भारताचा आजवरचा इतिहास आहे. आताची राहुल गांधींची भारत जोडो यात्राही त्याला अपवाद ठरली नाही.

राहुल गांधींना हिणवण्यासाठी गेली कित्येक वर्षे चालू असलेलं एक मोठ्ठं प्रोपगांडा इंजिन असो किंवा काँग्रेस पक्षच अस्तित्वात नाही असं म्हणणारे असो... या सगळ्यांना 'भारत जोडो'ला मिळालेल्या उस्फूर्त प्रतिसादानं चोख उत्तर दिलंय. देशाच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर टोकापर्यंत प्रत्येक ठिकाणी सामान्य माणसं, तरुण, महिला ते अगदी लहान मुलं... समाजातले सगळे घटक राहुलजींना भेटायला येत होते आणि भेटून भारावून जात होते. आश्वस्त होत होते की, गेल्या आठ वर्षांत जे काही द्वेषाचं, दुहीचं विचित्र वातावरण भारतात बनलंय, त्यात लवकरच बदल होणार आहे. या बदलाचा प्रणेता आणि कर्ता करविता असेल तो म्हणजे राहुल गांधी!

'लोग आते गए और कारवा बनता गया' असं जे म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'भारत जोडो' यात्रा. 'भारत जोडो' महाराष्ट्रात असताना पंधरा दिवस राहुलजींबरोबर राहता आलं, पाहता आलं, त्यांना अनुभवता आलं, त्यांची सहजता, लोकांशी आपलेपणानं साधलेला संवाद आणि त्यातून लक्षात आलं, की ही यात्रा किती महत्वाची आहे. यातूनच प्रेरणा घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहराच्या चौकात आपण ही यात्रा पोहोचवण्याचा प्रयत्न एलइडी व्हॅनच्या माध्यमातून केला. या माध्यमातून ही यात्रा सामान्य लोकांना पाहता, अनुभवता आली. त्यामुळं संपूर्ण कोल्हापूरला माहीत आहे की, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळं नक्की काय बदल होणार आहे, असं पाटील म्हणाले.

यात्रेमुळं अख्खा देश भारावून गेलाय

जरी या यात्रेची सांगता झाली असली, तरी या यात्रेमुळं अख्खा देश भारावून गेलाय. विचार बदलत आहेत आणि बदललेले विचार लवकरच मतपेटीतूनसुध्दा नक्की दिसून येतील. त्यामुळं आजचा दिवस ही भारत जोडो यात्रेची सांगता नाही आहे, तर तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रेरणा देत, भारताच्या भविष्याला नवा आकार देत सुरु झालेल नवं 'राहुल पर्व' आहे. त्या नव्या पर्वाचा हा जणू प्रारंभ आहे. काल श्रीनगरमधील सभेत अखंडपणे बर्फवृष्टी झेलत राहुल गांधींनी साधलेला संवाद हा देशात नवी ऊर्जा आणि उत्साह निर्माण करणारा आहे, असं बंटी पाटील यांनी नमूद केलं.