व्हीआयपींना परदेशातही ‘एसपीजी’

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 8 October 2019

सरकारने यापुढे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना परदेशातही ‘एसपीजी’ सुरक्षा देण्याचा निर्णय केला आहे. आतापर्यंत केवळ देशांतर्गत ‘एसपीजी’ सुरक्षा कवच मिळत होते. यानुसार ही सुरक्षा सोबत नसल्यास परदेश दौरा रद्द होईल. गांधी कुटुंबीयांच्या परदेश दौऱ्यांशी या निर्णयाची सांगड घातली जात आहे.

नवी दिल्ली - सरकारने यापुढे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना परदेशातही ‘एसपीजी’ सुरक्षा देण्याचा निर्णय केला आहे. आतापर्यंत केवळ देशांतर्गत ‘एसपीजी’ सुरक्षा कवच मिळत होते. यानुसार ही सुरक्षा सोबत नसल्यास परदेश दौरा रद्द होईल. गांधी कुटुंबीयांच्या परदेश दौऱ्यांशी या निर्णयाची सांगड घातली जात आहे. 

‘एसपीजी’ सुरक्षा व्यवस्था विद्यमान पंतप्रधान आणि माजी पंतप्रधानांना मिळते. सद्यःस्थितीत अशी सुरक्षा व्यवस्था असलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गांधी कुटुंबातील सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांचा समावेश आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या सुरक्षेत पाच वर्षांनंतर बदल करण्यात आला असून, त्यांना ‘एसपीजी’ऐवजी ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. सुधारित नियमानुसार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना परदेशातही ‘एसपीजी’ सुरक्षा सरकारने बंधनकारक केली आहे; अन्यथा परदेश दौरा रद्द करावा लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

ऐन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावरून काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. ते बॅंकाकमध्ये आहेत की कंबोडियामध्ये आहेत, याबाबत स्पष्टता नाही. असे असताना, सरकारच्या ताज्या निर्णयामुळे नवीच चर्चा सुरू झाली आहे. राहुल यांच्या परदेशवारीबद्दल सत्ताधारी भाजपकडून सातत्याने प्रश्‍न उपस्थित केला जातो.

आतापर्यंत गांधी कुटुंबीयांच्या परदेश दौऱ्यामध्ये पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंतच सुरक्षा व्यवस्था त्यांच्यासोबत असे. त्यानंतर सुरक्षा रक्षकांना परत पाठविले जात असे. आता नव्या व्यवस्थेमध्ये गांधी कुटुंबीयांनाही परदेश दौऱ्यात ‘एसपीजी’ सुरक्षा रक्षकांना सोबत न्यावे लागणार आहे. मात्र, राहुल यांच्या विद्यमान दौऱ्यातही सुधारित व्यवस्था लागू होईल काय, याबद्दल सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SPG Security in Foreign for VIP