Education : दहावीतील अनेकांना वाचता येईना मातृभाषेतील पुस्तक; ‘असर’ने दिला अहवाल

देशातील १४ ते १८ या वयोगटातील सुमारे २५ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषतील इयत्ता दुसरीच्या दर्जाचे पुस्तकही योग्यरीत्या वाचता येत नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
Reading
Readingsakal

नवी दिल्ली - देशातील १४ ते १८ या वयोगटातील सुमारे २५ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषतील इयत्ता दुसरीच्या दर्जाचे पुस्तकही योग्यरीत्या वाचता येत नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. देशभरात सर्वेक्षण केल्यानंतर ॲन्युअल स्टेट्स ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (असर) हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या अहवालानुसार, ८६.६ टक्क्यांपेक्षा जास्त युवक हे शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतात. म्हणजेच, माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतरही उच्च माध्यमिक शिक्षणाकडे जवळपास १३.६ टक्के विद्यार्थी पाठ फिरवितात. पुढील शिक्षण घेणाऱ्यांपैकी साधारणपणे निम्म्यापेक्षा जास्त युवक हे मानवविद्या शाखेची निवड करतात.

या अहवालानुसार, प्रवेश घेताना लिंग गुणोत्तरातील फरक खूपच कमी आहे. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी नोंदणी न केलेल्या युवकांमध्ये १४ वर्षीय युवकांचे प्रमाण हे ३.९ टक्के इतके असून, १८ वर्षीय युवकांमध्ये हेच प्रमाण साधारणपणे ३२.६ टक्के इतके आहे.

अकरावी आणि बारावीत शिकणारे सुमारे ५५ टक्के विद्यार्थी हे मानवविद्या शाखेला प्रवेश घेतात. त्यानंतर विज्ञान आणि वाणिज्य या शाखांत प्रवेश घेण्याकडे त्यांचा कल असलेला दिसून येतो. देशातील एकूण युवकांपैकी ५.६ टक्के युवक हे सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेत आहेत.

तसेच, त्यांनी त्यासंबंधीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे. युवक महाविद्यालयीन काळात व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे पसंत करत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी कोरोनाकाळात शाळा सोडल्याचे म्हटले जाते. मात्र, ही बाब निराधार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

लहान मुलांच्या प्रमाणात वाढ

प्राथमिक वयोगटातील अर्थात सहा ते १४ या वयोगटातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. यातील आकडेवारीनुसार, २०१० मध्ये हे प्रमाण ९६.६ टक्के इतके होते. त्यानंतर २०१४ मध्ये प्रवेश घेण्याचे प्रमाण ९६.७ टक्के इतके झाले. २०१८ मध्ये ते ९७.२ टक्के झाले, तर २०२२ मध्ये त्यात पुन्हा वाढ होऊन ते ९८.४ टक्क्यांपर्यंत पोहोचले.

महिलांचे प्रमाण कमी

स्टेम अर्थात सायन्स (विज्ञान), टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान), इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) आणि मॅथेमॅटिक्स (गणित) या विद्याशाखांमध्ये प्रवेश घेण्याचे प्रमाण मुलींमध्ये मुलांपेक्षा कमी असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

असे झाले सर्वेक्षण -

- देशातील २६ राज्यांतील २८ जिल्ह्यांची निवड

- १४ ते १८ वयोगटातील ३४ हजार ७४५ विद्यार्थ्यांशी संवाद

- प्रत्येक राज्यांमधील एका ग्रामीण जिल्ह्याचे सर्वेक्षण केले गेले

अहवालातील माहिती

१४ ते १८ वयोगटातील अर्ध्यापेक्षा जास्त युवक तीन ते एक अंकापर्यंतच्या आकडेमोडीच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकले नाहीत.

अर्ध्याहून अधिक युवकांनी (५७.३ टक्के) इंग्रजी भाषेतील वाक्ये वाचली. परंतु,त्यातील तीन चतुर्थांश युवकांना त्याचा अर्थ सांगता आला.

मुलांच्या तुलनेत मुली आपल्या क्षेत्रीय भाषेतील इयत्ता दुसरीचा धडा चांगल्या पद्धतीने वाचत असल्याचे दिसून आले. मात्र, गणित आणि इंग्रजी मध्ये मुलींच्या तुलनेत मुले अधिक चांगल्या पद्धतीने कामगिरी करत असल्याचे दिसून आले.

१४ वर्षे वयातील ३.९ टक्के युवक आणि अठरा वर्षाचे ३२.६ टक्के युवक शिक्षण घेत नसल्याचे दिसून आले.

सर्वेक्षण अहवालानुसार ९० टक्के युवकांच्या घरी स्मार्टफोन आहे. त्यातील सर्व युवक स्मार्टफोनचा वापर करू शकतात.

मुलींच्या तुलनेत दुप्पट मुलांकडे स्वतःचा स्मार्टफोन असल्याचे निष्पन्न झाले.

सुमारे ८० टक्के युवकांनी केवळ मनोरंजनासाठी ‘स्मार्टफोन’चा उपयोग केल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com