मानसिक त्रासातून दूर राहायचंय तर मग मोबाईल लांबच ठेवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

मेंदूला चांगल्या पद्धतीने कार्यक्षम ठेवण्यासदेखील जिकिरीचे असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

वॉशिंगटन ः स्मार्ट फोनपासून लांब राहणे ही आव्हानात्मक बाब असून मेंदूला चांगल्या पद्धतीने कार्यक्षम ठेवण्यासदेखील जिकिरीचे असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. वागण्याच्या सवयीच्या अभ्यासासंदर्भात एका अभ्यासामध्ये 114 कॉलेजमधील अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना एक शब्दकोडे सोडवण्यास सांगितले.

यादरम्यान निम्म्यापेक्षा जास्त मुलांनी स्मार्टफोन वापरण्यासाठी मध्येच ब्रेक घेतला; तर काहींनी पेपर वाचन किंवा कंप्युटरचा वापर केला. दरम्यान, यातील काही मुलांनी कोडे सोडवेपर्यंत मध्ये ब्रेक घेतला नाही. अमेरिकेतील रुटगर्स विद्यापीठाच्या अभ्यासकांना या अभ्यासात असे आढळले, की शब्द कोडे सोडवण्यासाठी सहभागी झालेल्यांपैकी ज्यांनी कोडे सोडवण्यादरम्यान फोनचा वापर केला, ते मानसिकरीत्या खूपच खचलेले होते.

तसेच त्यांना या शब्द कोड्यातील किमान काही शब्ददेखील सोडवणे जमले नाही; तर ज्या विद्यार्थ्यांनी कोडे सोडवताना मध्ये ब्रेक घेतला नाही, त्यांची कार्यक्षमता आणि कामाचा वेग कोडे सोडवताना ब्रेक घेतलेल्या विद्यार्थ्यांशी तुलना केल्यास अधिक असल्याचे दिसून आले; तर ज्या विद्यार्थ्यांनी कोडे सोडवल्यानंतर ब्रेक घेतला, त्यांना शब्द कोडे सोडवताना थोड्या अडचणी आल्या. 

हे कोडे सोडवण्यासाठी जे विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यामध्ये फोन वापरण्यासाठी ब्रेक घेतला अशा 19 टक्के विद्यार्थ्यांना कोडे सोडवण्यास खूपच जास्त वेळ लागला; तर ज्यांनी इतर परिस्थितीत एकत्र ब्रेक घेतला होता असे 22 टक्के विद्यार्थी असे होते, ज्यांना कोडे सोडवण्यास त्यांच्या तुलनेत कमी कालावधी लागला.

काम करताना जर तुम्ही फोनचा वापर केला, तर तुमच्या कामाचा दर्जा सामान्य होऊन जातो, असे रूटगर्स बिझनेस स्कूलच्या सहायक प्राध्यापक टेरी कुर्टर्झबर्ग म्हणाल्या. तसेच काम करताना फोनचा वापर वाढतच आहे, त्यामुळे कामावरील लक्ष विचलित होत असल्याचेदेखील टेरी कुर्टर्झबर्ग म्हणाल्या. फोनवर सतत मेसेज पाहणे, लोकांशी कनेक्‍ट राहणे, तसेच सतत माहिती घेत राहणे, यासाठी फोनचा वापर केल्यामुळे आपल्या वागण्यावरदेखील परिनाम होतो. यामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी कंप्युटर, लॅपटॉपच्या स्क्रीनचा वापर आपण कशा पद्धतीने करतो याचादेखील समावेश असल्याचे त्या म्हणाल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stay away from mental distress then keep your mobile