बिहारमध्ये अखेर नरभक्षक वाघ ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

STF team fired four shots Nine people were killed Man-eating tiger killed in Bihar

बिहारमध्ये अखेर नरभक्षक वाघ ठार

पाटणा : बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील बगहा गावात नऊ महिन्यांत नऊ जणांचा बळी घेणाऱ्या साडे तीन वर्षाच्या नरभक्षक वाघाला आज दुपारी ‘एसटीएफ’च्या नेमबाजांनी ठार केले. या पथकाने त्याच्यावर चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या लागल्याने वाघ गतप्राण झाला. नरभक्षक वाघाला मारण्याचे आदेश वन्यजीव विभागाने दिले होते.

वाल्मीकी वाघ प्रकल्पात वावरणाऱ्या नरभक्षक वाघाने दहा जणांवर हल्ले केले होते.त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. आज देखील वाघाच्या हल्ल्यात आई आणि मुलाचा मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसात वाघाने चौघांचा बळी घेतला.

काल नरभक्षक वाघाला मारण्याचे आदेश दिल्यानंतर गावात मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात केले. तसेच पोलिसांनी गावकऱ्यांना घरातच थांबण्याची सूचना केली होती. वाघाला पकडेपर्यंत कोणीही घराबाहेर एकट्याने जाऊ नये, असे सांगितले होते. तरीही आई आणि मुलगा शेतात गेले. मात्र दुपारी दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर गावकरी संतापले आणि त्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. यादरम्यान, बगहा गावातील उसाच्या शेतात नरभक्षक वाघाला ‘एसटीएफ’च्या पथकाने घेरले. हत्तीवरून गेलेल्या पथकाला वाघ दिसताच त्यांनी चार गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या वाघाने जागीच प्राण सोडले. हा वाघ तीन फूट उंच व पाच फूट लांब होता.

चारशे जणांचे पथक होते मागावर

१२ सप्टेंबर रोजी शेतात काम करणाऱ्या गुलबंदी देवी यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वाघाला पकडण्याचे आदेश देण्यात आले. तेव्हापासून वनविभागाचे पथक नरभक्षक वाघाच्या मागावर होती. या वाघाने अनेक जनावरे मारली. याला जिवंत पकडण्यासाठी ४०० जणांचे पथक तयार केले होते.

वाघ नरभक्षक का होतो

जखमी आणि वयस्कर वाघ नरभक्षक होत असल्याचे मानले जाते. एखाद्या माणसाची शिकार करणे हे वाघासाठी जनावरांच्या तुलनेने सोपे असते. परंतु अनेकदा तरुण वाघ देखील नरभक्षक झाल्याचे आढळून आले आहे. एखाद्या वाघाला शारीरिक यातना होत असतील किंवा दात तुटला असेल तो माणसावर आणि मेंढपाळांवर हल्ला करू लागतो.

चंपावतच्या घायाळ वाघिणीकडून ४०० जणांचा बळी

चंपावतची राक्षसीन, चंपावतची नरभक्षक असे कितीतरी नाव तिला होते. नेपाळ आणि कुमाऊँ येथे तिची दहशत होती. जंगलात डझनापेक्षा अधिक मुले, पुरुष आणि महिलांना तिने टार्गेट केले होते. तिला पाहणारा जिवंत राहत नव्हता. चंपावतच्या त्या वाघिणीने ४३६ जणांना मारले. तिची दहशत संपविण्याचा विडा उचलला तो जिम कॉर्बेट यांनी. त्या वाघिणीने एका मुलीचा बळी घेतला होता. या हल्ल्याच्या खाणाखुणा तपासत कॉर्बेट तिच्यापर्यंत पोचले. १९११ मध्ये कॉर्बेट यांनी तिला मारले. त्यांनतरच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मोहीम ‘टी वन’

काही वर्षांपूर्वी यवतमाळ परिसरात एक महिलेचा ‘अवनी’ या वाघिणीने पहिला बळी घेतला. त्यानंतर सलग १३ जण तिच्या हल्ल्यात ठार झाले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाघिणीला जेरबंद किंवा अंतिम पर्याय म्हणून ठार मारण्याचे आदेश दिले गेले. या मोहिमेला ‘टि-वन’ असं नाव देण्यात आले. तिला पकडण्यासाठी जंगलात कॅमेरे लावले, पाच नेमबाज नेमले, मध्य प्रदेशातून चार हत्ती आणले, पण ती सापळ्यात अडकत नव्हती. अखेर २ नोव्हेंबर २०१८ रोजी तिला गोळ्या घालून ठार केले.

दुधवा राष्ट्रीय उद्यानात दहशत

उत्तर प्रदेशच्या दुधवा नॅशनल पार्क १९७० च्या दशकात कुख्यात होते. दुधवा व्याघ्र प्रकल्पाचा भाग रात्र सोडा, दिवसा देखील धोक्याचा ओळखला जायचा. त्यावेळी अनेक नरभक्षक वाघ सक्रिय होते. तारा नावाच्या वाघिणीने २४ जणांचा बळी घेतला होता.

कुमाऊचा नरभक्षक बंगाल टायगर

उत्तराखंडच्या कुमाऊं क्षेत्र वाघांचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी नरभक्षक बंगाल टायगरची संख्या लक्षणीय आहे. चौगड येथील कुख्यात वाघांची जोडी देखील सक्रिय होती. या जोडीने ६४ जणांचा बळी घेतला होता.

टॅग्स :BihartigeranimalDesh news