'चंद्र'स्वारीतील यश फक्त साठ टक्केच!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 September 2019

मागील सहा दशकांमध्ये जगभरातील विविध देशांनी चांद्र मोहिमा आखल्या होत्या, पण त्या यशस्वी होण्याचे प्रमाण हे केवळ साठ टक्केच असल्याचे अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था (नासा) मून फॅक्‍ट शीटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : मागील सहा दशकांमध्ये जगभरातील विविध देशांनी चांद्र मोहिमा आखल्या होत्या, पण त्या यशस्वी होण्याचे प्रमाण हे केवळ साठ टक्केच असल्याचे अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था (नासा) मून फॅक्‍ट शीटमध्ये नमूद करण्यात आले आहे. या काळामध्ये 109 चांद्र मोहिमा आखण्यात आल्या होत्या त्यातील 61 यशस्वी ठरल्या असून, 48 अपयशी ठरल्या आहेत. याच वर्षी इस्राइलनेही चंद्रावर अंतराळ मोहीम आखली होती पण एप्रिल महिन्यामध्ये त्यांचे यानही कोसळले होते.

1958 ते 2019 या काळामध्ये अमेरिका आणि रशियाप्रमाणेच जपान, युरोपियन युनियन, चीन आणि इस्राइलने विविध अंतराळ मोहिमा आखल्या होत्या. या देशांनीही ऑर्बिटर आणि लॅंडर्स अवकाशात पाठविले होते पण त्यांनाही त्यात यश मिळाले नव्हते. अमेरिकेने पहिली चंद्र मोहीम 17 ऑगस्ट 1958 रोजी आखली होती पण त्यातही त्यांना अपयशच हाती आले होते. रशियाने 4 जानेवारी 1959 रोजी आखलेली ल्युना नामक मोहीम यशस्वी ठरली होती. यामध्येही यानाने केवळ चंद्राभोवती फेऱ्या मारूनच माहिती संकलित केली होती. यानंतर ऑगस्ट 1958 ते नोव्हेंबर 1959 या काळामध्ये अमेरिका आणि रशियाने चौदा मोहिमा आखल्या होत्या. यातील ल्युना-1, ल्युना-2 आणि ल्युना-3 या यशस्वी ठरल्या होत्या. या सगळ्या मोहिमांचा सूत्रधार रशिया होता.

अमेरिकेने जुलै 1964 मध्ये "रेंजर-7' ही मोहीम आखून यानाचे प्रक्षेपणही केले होते. चंद्राचे सर्वांत जवळून छायाचित्र टिपण्याचे काम या मोहिमेने केले होते. रशियाने चंद्रावर पाठविलेल्या ल्युना-9 या यानाने चंद्रावर पहिल्यांदा सॉफ्ट लॅंडिंग केले होते तसेच चंद्राच्या पृष्ठभागाचे पहिले छायाचित्र टिपण्याचे कामही त्यानेच केले होते. पुढे मे 1966 मध्ये अमेरिकेने सर्व्हेयोर-1 ही मोहीम आखली होती ती देखील यशस्वी ठरली. 

चंद्रावर मानवाचे पाऊल 

अपोला-11 ही मोहीम मात्र चांद्र इतिहासामध्ये सर्वांत यशस्वी मोहीम ठरली, कारण या माध्यमातूनच मानवाने प्रथमच चंद्रावर पाऊल ठेवले होते. अंतराळ मोहिमांचा 1958 ते 1979 पर्यंतचा इतिहास लक्षात घेतला केवळ अमेरिका आणि रशिया या दोन देशांनीच मोहिमा आखल्याचे दिसून येते. या एकवीस वर्षांच्या काळात दोन्ही देशांनी 90 मोहिमा आखण्यात आल्या होत्या, त्यानंतर मात्र या मोहिमांना ब्रेक लागला होता, तो काळ 1980 ते 89 हा होता. पुढे याच अंतराळ स्पर्धेमध्ये युरोपियन युनियन, चीन, भारत आणि इस्राइलनेही प्रवेश केला. 

अन्य देशांची एंट्री 

जपानने जानेवारी 1990 मध्ये हिटेन ऑर्बिटर चंद्राच्या दिशेने पाठविले. ही जपानची पहिली चांद्र मोहीम होती. यानंतर सप्टेंबर 2007 मध्ये जपानने सेलेने हे यान अवकाशात पाठविले. 2000 ते 2009 या काळामध्ये सहा चांद्र मोहिमा आखण्यात होत्या, यामध्ये युरोप (स्मार्ट-1), जपान (सेलेने), चीन (चांगे-1), भारत (चांद्रयान-1) आणि अमेरिका आदी देशांचा समावेश होता.

2009 ते 2019 या काळामध्ये दहा मोहिमा आखण्यात आल्या होत्या यामध्ये भारताच्या पाच, अमेरिकेच्या तीन आणि पुन्हा भारत आणि इस्राइलच्या प्रत्येकी एका मोहिमेचा समावेश होतो. 1990 पासून अमेरिका, जपान, भारत, युरोपियन युनियन, चीन आणि इस्राइल यांनी 19 मोहिमा आखल्या होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success of Chandrayaan 2 is only 60 Percentage