महिला कार्यकर्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; शबरीमला मंदिर परिसरात तणाव

अजयकुमार
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

केंद्रातील भाजप सरकारने याप्रकरणी 48 तासांत निर्णय न घेतल्यास सरकार हिंदूविरोधी असल्याचे समजले जाईल. 

- प्रवीण तोगडिया, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद 

तिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी मंदिर बुधवारपासून (ता. 17) खुले होणार असले तरी तेथे आज तणाव होता. मंदिराच्या "निलाक्कल' या मुख्य प्रवेशद्वाराशी वाहने थांबवून 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना मंदिराकडे जाण्यापासून रोखण्यात येत होते. न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या एका महिला कार्यकर्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. 

सह्याद्रीच्या पश्‍चिम घाटातील डोंगर रांगेत शबरीमला मंदिर वसलेले आहे. या मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिले आहेत. त्यानंतर प्रथमच मंदिर उद्या खुले होणार आहे. यामुळे येथे भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. यात मासिक पाळी येण्याच्या वयोगटातील महिलांना मंदिरात जाण्यापासून रोखले जात आहे. मात्र, भाविकांना मंदिराकडे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी स्पष्ट केले. तसे करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

दर्शनासाठी खासगी वाहनातून व राज्य परिवहन विभागाच्या बसची तपासणी करीत तरुण महिलांना त्यातून उतरविण्यात येत होते. वाहनातून मंदिराकडे जाणाऱ्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींच्या एका गटाला शबरीमला बचाव महिला कार्यकर्त्यांनी वाहनातून खाली उतरविले. हा प्रकार सुरू असताना तुरळक पोलिस तेथे उपस्थित होते. 

"महिलांना रोखणाऱ्यांवर कडक कारवाई' 

मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले की, मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांना रोखणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर फेरविचार करण्याठी याचिका दाखल करण्याचा केरळ सरकारचा कोणताही विचार नाही. हा निर्णय सरकार अमलात आणणार आहे. सरकारने याप्रकरणी भूमिका स्पष्ट केली असून, लिंगभेद करणार नाही. मात्र, याप्रकरणी कोणतेही धोरण आखण्याचा सरकारचा विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

आजच्या घडामोडी 

- देवस्वम मंडळाच्या बैठकीवर पंडालम राजघराणे, पुजाऱ्यांच्या प्रतिनिधींचा बहिष्कार 
- काही हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन 

Web Title: Suicide attempt of women activist Tension in Shabrima temple area