esakal | अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

arnab goswam

50 हजार रुपयांच्या पर्सनल बाँडवर अर्णब गोस्वामींना जामीन देण्यात आला आहे.

अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा


सुप्रीम कोर्टात रिपब्लिक न्यूज चॅनलचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती डॉ. डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाला चांगलंच फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की, FIR प्रलंबित असताना जामीन न देणं ही न्यायाची एकप्रकारे थट्टाच आहे. तसंच या प्रकरणामध्ये कोर्टाने आता हस्तक्षेप नोंदवला नाही तर आपण विनाशाच्या दिशेने जाऊ असंही निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं आहे. 

सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींनाही जामीन देण्यात आला आहे. आज अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होती. मुंबई उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांची जामीन याचिका फेटाळल्यानंतर काही तासांतच त्यांनी सुप्रीम कोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. 

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या न्यायपीठापुढे ही सुनावणी पार पडली. अर्णब गोस्वामी यांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाकडून चूका झाल्याचं सुप्रीम कोर्टाने यावेळी म्हटलं आहे. तसेच वैयक्तिक स्वातंत्र्य नाकारताना उच्च न्यायालयाने योग्य पद्धतीने ही कारवाई केली नसल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं.

FIR खरी मानली आणि चौकशीचा भाग असली तरी पैसे न देणं हा आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा कसा? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला आहे. तसेच आज कोर्टाने हस्तक्षेप केला नाही तर आपण विनाशाच्या दिशेने जाऊ, असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

का झाली होती अटक...?
5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत होतं. सुमारे पाच कोटी रुपये थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अक्षता नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत, 26 मे 2020 रोजी सांगितलं की, "आज्ञा नाईक म्हणजेच अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांची मुलगी यांनी अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकनं पैसे थकवल्यानं वडील आणि आजीनं आत्महत्या केली असून या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत नाहीत अशी तक्रार केली आहे. त्यानंतर मी सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत." आणि म्हणून या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या घरी शिरुन अटक करण्यात आली  होती.