INX Media : चिदंबरम यांना न्यायालयाकडून दिलासा; 5 सप्टेंबरपर्यंत अटक नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 5 सप्टेंबर रोजी आदेश दिले जातील, असे आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 5 सप्टेंबर रोजी आदेश दिले जातील, असे आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. चिदंबरम यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या संदर्भात खटला भरला असून, त्यांच्यावर हवाला व्यवहार आणि आर्थिक अफरातफरीचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

न्या. आर. बानुमती आणि न्या. ए. एस. बोपन्ना यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने आज चिदंबरम यांना अटकेपासून देण्यात आलेल्या अंतरिम संरक्षणात पुढील गुरुवारपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे आजच्या सुनावणीवेळी चिदंबरम यांनी सोमवारपर्यंत (ता.2) 'सीबीआय'च्या कोठडीमध्ये राहण्याची तयारी दर्शविली होती.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ करण्याचा निर्णय केवळ सीबीआय कोर्टाकडून घेतला जाऊ शकतो, असा दावा केला. मात्र, यावर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य करणे टाळले. न्यायालयाने या वेळी 'ईडी'कडून जे पुरावे न्यायालयामध्ये सादर केले जातील, ते आधीच सीलबंद लिफाफ्यात सादर करण्याचे निर्देश दिले. या दस्तावेजांवर निर्णय घेण्याचा विचार नंतर केला जाईल, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme Court reserves order for 5 September extends interim protection from ED arrest