Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांसाठी "न्यूट्रल साइटेशन" लाँच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supreme Court

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांसाठी "न्यूट्रल साइटेशन" लाँच

Supreme Court : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सर्व निकालांसाठी न्यूट्रल साइटेशन म्हणजेच तटस्थ उद्धरण आज सादर केले, अशी माहिती भारताचे सरन्यायाधीश (CJI) डीवाय चंद्रचूड यांनी गुरुवारी सांगितले.

तटस्थ उद्धरण न्यायालयाने दिलेल्या सर्व 30,000 निकालांसाठी असेल, असेही चंद्रचूड यांनी यावेळी स्पष्ट केले.

दिल्ली, केरळ उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयांनी यापूर्वीच त्यांच्या निकालांसाठी तटस्थ उद्धरण सादर केले आहे.

त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांच्या निकालांसाठी तटस्थ उद्धरण सादर करण्यात आले आहे.

ते म्हणाले की, "आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे तटस्थ उद्धरण सुरू केले असून, हे तटस्थ उद्धरण सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व 30,000 निकालांसाठी लागू असेल.

यामध्ये पहिल्या टप्पा 2014 ते 1 जानेवारी 2023 पर्यंतचा, तर दुसरा टप्पा 1950 ते 2013 पर्यंतचा असेल"

याशिवाय न्यायालयाचे निकाल इंग्रजीमधून स्थानिक भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी मशीन लर्निंग टूल्सचा वापर केला जात आहे.

आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या 2,900 निकालांचे भाषांतर पूर्ण झाले असून, जिल्हा न्यायाधीशांना हे भाषांतर तपासण्यास सांगितले आहे.

मशीनच्या माध्यमातून करण्यात येणारे निकालांचे भाषांतर अचूक आहे की नाही हे तपासण्यासाठी जिल्हा न्यायाधीश, कायदा संशोधक आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची एक टीमदेखील असल्याचे चंद्रचूड यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये न्यायालयाच्या निकालांसाठी एकसमान आणि अद्वितीय उद्धरण विकसित करण्यासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे तीन सदस्यीय पॅनेल तयार केले होते.

न्युट्रल सायटेशन म्हणजे काय?

उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे अनेक प्रकारचे निकाल, न्यायनिवाडे न्यायालयीन सुनावणीनंतर होत असतात. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात, आम्ही वकील मंडळी अनेक न्यालयांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकालांचे दाखले देत असतो त्याला सायटेशन असे म्हणतात.

सदरचे निकाल हे लाॅ पब्लिशिंग हाऊस किंवा अनेक प्रकाशन कंपन्यांच्यावतीने अनेक जनरल्स, पुस्तकांतून प्रसिद्ध होत असतात. तसेच वेगवेगळ्या पुस्तकांमधून इंग्रजी भाषेतून ते न्यायनिवाडे प्रसिद्ध होत असतात. सामान्य माणसाला मात्र कायद्याची भाषा समजतेच असे नाही, परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली न्यायनिवाडे देशातील प्रत्येक भाषेतून प्रकाशित किंवा प्रसिद्ध करण्याचे ठरविले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे निकाल देशातील सामान्य माणसाला समजावे म्हणून त्या-त्या राज्यातील भाषांमध्ये रुपांतरीत किंवा अनुवादित करून सर्वोच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली ते प्रसिद्ध करणार आहेत त्याला न्युट्ल सायटेशन असे म्हणता येईल, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी सकाळशी बोललताना दिली.

टॅग्स :Supreme Courtcji