सुशांत आत्महत्याः एम्सच्या अहवालानंतर भाजप आता फॉरेन्सिक टीमवरही आरोप करेल, काँग्रेस नेत्याचा टोला

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 4 October 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची हत्या नसून आत्महत्याच असल्याचा अहवाल दिल्ली स्थित एम्सने दिला आहे.

नवी दिल्ली- अभिनेता सुशांतसिंह राजपूतची हत्या नसून आत्महत्याच असल्याचा अहवाल दिल्ली स्थित एम्सने दिला आहे. आता यावरुनही राजकारण रंगले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपची प्रचार यंत्रणा एम्सच्या न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथकावरही याबाबत आरोप करु शकते, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

भाजपच्या प्रचार यंत्रणेने सुशांतसिंहच्या हत्येचा कट रिया चक्रवर्तीने  रचल्याचा आरोप केला होता. सुशांतच्या मृत्यूचे दुःख आम्हालाही आहे. परंतु, एका महिलेला आरोपी ठरवून त्याचा खोटा सन्मान केला जाऊ शकत नाही, असे चौधरी म्हणाले. 

'खेती बचाओ' यात्रा सुरु; राहुल गांधी म्हणाले, 'सत्तेवर येताच...

यापूर्वी चौधरी यांनी रिया चक्रवर्ती ही निर्दोष असल्याचे म्हटले होते. तिला मुक्त केले जावे, अशी मागणी करत ती कटाची बळी ठरल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

सुशांतसिंहच्या आत्महत्येपासून अभिनेत्री कंगना राणावतने एकापाठोपाठ एक असे चार टि्वट करत याप्रकरणी नवे प्रश्न उपस्थित केले. शनिवारी सलग चार टि्वट करत तिने एखाद्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे गुन्हा नाही का ? असा सवाल केला. 

'एम्स'च्या अहवालाबाबत कंगनाने यापूर्वीही नाराजी व्यक्त केली होती. 'तरुण आणि विलक्षण माणसं एके दिवशी अचानक उठून स्वत:चं आयुष्य संपवत नाहीत. आपल्या जीवाला धोका असल्याचं, चित्रपटसृष्टीतून आपल्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सुशांत वारंवार सांगत राहिला. मुव्ही माफिया त्याला त्रास देत असल्याचंही तो बोलला. बलात्कार केल्याच्या खोट्या आरोपांनी देखील त्याला प्रचंड मानसिक त्रास झाला होता.' असंही कंगनानं म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh Rajput Aiims Postmortem Report Congress Leader Adhir Ranjan slams on Bjp